Sakshi Dhoni Viral Video: साक्षी धोनीचा 'तो' उत्साह पाहून MS धोनीची मजेशीर प्रतिक्रिया; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

साक्षीला जल्लोष करताना पाहून धोनीने अत्यंत शांतपणे तिला खाली बसण्याचा इशारा केला. त्याने दिलेला हा मजेशीर रिएक्शन कॅमेऱ्यात कैद झाला.

पत्नी साक्षीच्या अतिउत्साहावर धोनीने दिली अशी प्रतिक्रिया

टी-20 विश्वचषक २०२६ च्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानावर खेळाडूंचा थरार पाहायला मिळत असतानाच, प्रेक्षक गॅलरीतही एक मजेशीर प्रसंग घडला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारताचा विजय जवळ असताना साक्षीने केलेला अतिउत्साही जल्लोष आणि त्यावर धोनीने दिलेली 'कुल' प्रतिक्रिया नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता. इंग्लंडच्या डावातील १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने सॅम करनचा एक सरळ फटका आपल्या फॉलो-थ्रूमध्ये अडवला. चेंडू बुमराहच्या हातात विसावल्याचे पाहून साक्षी धोनीला वाटले की फलंदाज बाद झाला आहे. या उत्साहात ती आपल्या जागेवरून उठून आनंदाने उड्या मारू लागली.

मात्र, वास्तवात तो झेल नव्हता तर चेंडू जमिनीला लागून बुमराहच्या हातात आला होता. ही गोष्ट अंपायर आणि मैदानावरील खेळाडूंनी त्वरित लक्षात घेतली होती. साक्षीचा हा 'प्री-मॅच्युअर' जल्लोष पाहून शेजारीच उभा असलेला 'कॅप्टन कूल' एमएस धोनी स्वतःचे हसू रोखू शकला नाही.

धोनीची 'ती' रिअॅक्शन व्हायरल

साक्षीला जल्लोष करताना पाहून धोनीने अत्यंत शांतपणे तिला खाली बसण्याचा इशारा केला. त्याने दिलेला हा मजेशीर 'रिअॅलिटी चेक' कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी धोनीच्या चेहऱ्यावरील मिश्किल स्मितहास्य पाहून जवळच बसलेले रोहित शर्मा, रितिका सजदेह आणि इतर सेलिब्रिटींनाही हसू आवरले नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी या क्षणाला "क्लासिक धोनी मोमेंट" असे म्हटले आहे.

सामन्याचा निकाल

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या धडाकेबाज ८९ धावांच्या जोरावर २५३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने कडवी झुंज दिली, मात्र भारताने ७ धावांनी हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. आता ८ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement