PSI Recruitment Scam: उमेदवारांचे PM Narendra Modi यांना रक्ताने पत्र; न्याय न मिळाल्यास दहशतवादी संघटनेत सामील होण्याची धमकी

त्यामुळे 54 हजार 289 उमेदवारांना पुन्हा एकदा परीक्षेला बसावे लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका उमेदवाराला पूर्ण 100 गुण मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आले

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

कर्नाटक पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत चौकशी सुरू आहे. या दरम्यान, काही उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये आपल्याला न्याय देण्याचे आवाहन केले गेले आहे. मोठी गोष्ट म्हणजे उमेदवारांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे. उमेदवारांचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पीएसआय भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणीही सोशल मीडियावरून होत आहे.

उमेदवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला न्याय न मिळाल्यास दहशतवादी संघटनेत सामील होण्याची धमकीही दिली आहे. कर्नाटक पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षा रद्द झाल्याबद्दल माहिती देताना, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी बेंगळुरू येथे पत्रकारांना सांगितले होते की, पीएसआय भरती परीक्षेत कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली असून लवकरच दुसरी परीक्षा घेण्यात येईल.

सध्या पीएसआय सीईटी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करत आहे. त्यांच्या चौकशीत कलबुर्गी येथील एका खाजगी शाळेतील शिक्षक उमेदवारांना परीक्षेत कॉपी करायला लावत असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकाची परीक्षेदरम्यान निरिक्षक म्हणून शाळेत नियुक्ती करण्यात आली होती आणि शाळा व्यवस्थापनाने त्यांना तसे करण्यास सांगितले होते. गेल्या आठवड्यात पोलीस उपअधीक्षक (DySP) शांता कुमार यांना उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. ते यापूर्वी पोलीस भरती शाखेशी संबंधित होते.

राज्य पोलीस भरती परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने अत्यंत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी राज्य पोलिसांच्या सीआयडी शाखेने भाजप कार्यकर्त्या दिव्या हगरागी हिला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्या मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. याआधी काँग्रेस नेते रुद्रगौडा पाटील आणि त्यांचा लहान भाऊ महांतेश पाटील आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी अफझलपूरच्या आमदाराशी निगडीत एका व्यक्तीसह 55 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: राहुल गांधी म्हणाले - मोदी सरकारला दोन भारत बनवायचे आहेत, आम्ही जोडतो, ते विभाजित करतात)

पीएसआय भरती घोटाळ्यामुळे गेल्या महिन्यात कर्नाटक सरकारने निकाल रद्द केला होता. त्यामुळे 54 हजार 289 उमेदवारांना पुन्हा एकदा परीक्षेला बसावे लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका उमेदवाराला पूर्ण 100 गुण मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या उमेदवाराने सेटच्या पेपरमधील केवळ 21 प्रश्न सोडवले होते. परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून ७५ ते ८० लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.