Online Fraud Training: अवघ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने 500 तरुणांना दिले ऑनलाइन फसवणुकीचे प्रशिक्षण; टेलीग्राम चॅनेल आणि इतर तंत्रे ऑपरेट करण्यास शिकवले, पोलिसांकडून अटक
मुलांना टेलिग्राम चॅनेल कसे चालवायचे आणि संभाव्य लक्ष्यांशी संवाद कसा साधायचा हे या वर्गामध्ये शिकवले जात होते.
Online Fraud Training: राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात 1 मार्च रोजी योगेश मीना नावाच्या एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. गावातील सुमारे 500 तरुणांना सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण दिल्याबद्दल योगेशला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी योगेशसह अन्य तिघांनाही अटक करण्यात आली, ज्यापैकी एक अल्पवयीन होता. गेल्या वर्षभरात सायबर फसवणुकीच्या किमान 50 प्रकरणांमध्ये योगेशचा हात असल्याचे मानले जाते. अटकेदरम्यान पोलिसांनी योगेशकडून सोन्याची अंगठी आणि अन्य तीन आरोपींकडून चार मोबाईलसह 82,000 रुपये रोख जप्त केले. योगेशने त्याच्या प्रशिक्षण सत्रासाठी बुंदी आणि सवाई माधोपूर जिल्ह्यातील रावल, बबई आणि चमनगंज या तीन गावांतील तरुणांची निवड केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सायबर क्राइमचे निरीक्षक संदीप अहलावत यांच्या मते, योगेश तरुणांसाठी तासभर सायबर फसवणुकीच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालवत असे. मुलांना टेलिग्राम चॅनेल कसे चालवायचे आणि संभाव्य लक्ष्यांशी संवाद कसा साधायचा हे या वर्गामध्ये शिकवले जात होते. फसवणूक करणाऱ्यांना लोकप्रिय ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर सेल्सपर्सन म्हणून उभे करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सायबर क्राईम शाखेला एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा शोध सुरु झाला. फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारांनी पिडीत व्यक्तीला एका टेलिग्राम चॅनलमध्ये जोडले होते. जिथे स्टॉक ट्रेडिंग गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे वचन देऊन 1 लाखाची फसवणूक केली गेली. याच तक्रारीच्या आधारे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Bengaluru Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित व्यक्तीचे आणखी एक CCTV फुटेल आले समोर, पहा व्हिडिओ)
पुढे तपासादरम्यान दयाराम मीना नावाच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी संबंधित पैशाचा माग काढला गेला. बबई येथील इयत्ता 11 वीच्या या विद्यार्थ्याने फसवणुकीमध्ये योगेशचा सहभाग उघड केला. त्यानंतर त्याला 1 मार्च रोजी अटक करण्यात आली. चौकशीमध्ये योगेशने सायबर फसवणुकीसाठी किमान 500 तरुणांना प्रशिक्षण दिल्याचे कबूल केले. झारखंडमधील जामतारा येथील कुख्यात सायबर क्राईम हबची आठवण करून देणारी ही घटना आहे. दयारामसोबत चमनगंज येथील विकास मीना आणि बुंदी येथील 15 वर्षीय अल्पवयीन योगेश यांनाही अटक करण्यात आली आहे. दयारामने 30 जणांची फसवणूक केली, विकासने 12 जणांची फसवणूक केली आणि योगेशने चार जणांची फसवणूक केली.