Snake Kills Wife And Daughter: विषारी सापाचा वापर करुन पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपीला अटक

ओडिशा (Odisha) राज्यातील गंजाम जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी 25 वर्षी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Poisonous Snake | Representational image (Photo Credits: pixabay)

पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीची हत्या (Kill) करण्यासाठी चक्क विषारी सापाचा (Poisonous Snake) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ओडिशा (Odisha) राज्यातील गंजाम जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी 25 वर्षी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करण्यासाठी त्याने चक्क विषारी साप घरात सोडला. ज्याने दंश केल्याने दोघींचाही मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला या हत्या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यावर हत्या आणि हत्येसाठी वन्य प्राण्यांचा वापर केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे सामान्य घटना म्हणून पाहिले होते. मात्र, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. तसेच हे प्रकरण केवळ सर्पदंशाचे नसून त्यापाठीमागे हत्येचा पूर्वनियोजीत कट असल्याचेही पुढे आले.

पोलीस तपासात सत्य बाहेर

ओडिशातील बेहरामपूर येथून जवळपास 50 किलोमीटर दूर कबीसूर्या नगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अधेगाव येथे ही घटना घडली. घटना घडून दीड महिने उलटल्यानंतर पोलीस तपासात प्रकरणाला वाचा फूटली. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीचे नाव के गणेश पात्रा असल्याचे पुढे आले. देबस्मीता नावाच्या तरुणीशी त्याचा 2020 मध्ये विवाह झाला होता. या विवाहातून दोघांना एक दोन वर्षांची मुलगीही झाली होती. मात्र, पुढे के गणेश पात्रा आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद झाला त्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा: साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष)

हत्येसाठी थंड डोक्याने आणि पुरेसा कट

पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेली धक्कादायक माहिती अशी की, आरोपीने अत्यंत थंड डोक्याने आणि पुरेसा कट आखूनच ही घटना केली आहे. आरोपीने त्याच्या एका मित्राकडून साप मिळवला. हा साप आपण धार्मिक कारणासाठी वापरणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले. मित्राची दिशाभूल करुन आणि त्याच्याशी खोटे बोलून मिळवलेला साप त्याने पत्नी आणि मुलीच्या हत्येसाठी वापरला.

हत्येसाठी कोब्रा जातीच्या सापाचा वापर

आरोपीने कोब्रा जातीचा साप (नाग) 6 ऑक्टोबर रोजी मिळवला. जो तो प्लास्टीकच्या एका भांड्यातून घेऊन आला. सोबत आणिलेला साप आरोपीने पत्नी आणि मुलगी झोपलेल्या खोलीत सोडला. सापाने खोलीत झोपलेल्या पत्नी आणि मुलीला दंश केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींचाही मृतदेह खोलीत आढळून आला. दोघींचा मृत्यू झाला त्या दिवशी आरोपी वेगळ्या खोलीत झोपला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासे पुढे आले, अशी माहिती गंजम जिल्हा पोलीस प्रमुख जगमोहन मिना यांनी दिली.