India Wedding Season: येत्या दोन महिन्यांत भारतात 48 लाख विवाह होण्याची अपेक्षा; व्यवसायात होऊ शकते 6 लाख कोटींची कमाई- CAIT
मागील वर्षी 2023 मध्ये 11 शुभ मुहूर्त होते, तर यावर्षी 18 मुहूर्त असल्याने, व्यवसायाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
India Wedding Season: नवरात्री, धनत्रयोदशी आणि दिवाळीत प्रचंड विक्री झाल्यानंतर देशभरातील व्यापारी आता आगामी लग्नसराईच्या (Wedding Season) तयारीत व्यस्त होत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने केलेल्या अभ्यासानुसार, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुमारे 48 लाख विवाह होण्याची अपेक्षा आहे, ज्यातून सुमारे 6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. गेल्या वर्षी या हंगामात 35 लाख लग्नांमधून एकूण 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. अहवालानुसार, एकट्या दिल्लीत अंदाजे 4.5 लाख विवाहसोहळ्यांमधून या हंगामात 1.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. कॅटने देशभरातील 75 प्रमुख शहरांमध्ये लग्नाशी संबंधित वस्तू आणि सेवांचे व्यवहार करणाऱ्या प्रमुख व्यापारी संघटनांशी झालेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे.
या वर्षी लग्नाच्या मुहुर्तांच्या तारखांमध्ये वाढ झाल्यामुळे व्यवसायात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षी 2023 मध्ये 11 शुभ मुहूर्त होते, तर यावर्षी 18 मुहूर्त असल्याने, व्यवसायाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. कॅटच्या वेद आणि अध्यात्म समितीचे निमंत्रक आचार्य दुर्गेश तरे यांच्या मते, यंदाच्या लग्नसराईत नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये बऱ्याच विवाहाच्या शुभ तारखा आहेत. यानंतर, लग्नाच्या हंगामात सुमारे एक महिना ब्रेक होईल आणि जानेवारीच्या मध्यापासून मार्च 2025 पर्यंत पुन्हा लग्नाचा हंगाम सुरू होईल.
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चांदनी चौक, दिल्लीचे खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, या अभ्यासातून असेही समोर आले आहे की ग्राहकांच्या खरेदीच्या वर्तनात मोठा बदल झाला आहे आणि ते आता परदेशी वस्तूंपेक्षा भारतीय उत्पादनांना अधिक प्राधान्य देत आहेत. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वोकल फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेला बळकटी देणारे मोठे यश आहे.
माहितीनुसार, दोन महिन्यांत देशभरातील 10 लाख विवाहांवर सरासरी 3 लाख रुपये खर्च केले जातील. सुमारे 10 लाख विवाहांसाठी 6 लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे 10 लाख लग्ने होतील ज्यामध्ये 10 लाख रुपये खर्च केले जातील आणि तेवढ्याच लग्नांसाठी 15 लाख रुपये खर्च होतील. सुमारे 7 लाख लग्ने होतील ज्यामध्ये सरासरी 25 लाख रुपये खर्च येईल, तर 50,000 विवाहांसाठी 50 लाख रुपये खर्च येईल. देशात अशी जवळपास 50,000 लग्ने होतील ज्यासाठी एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च अपेक्षित आहे. (हेही वाचा: Sambhajinagar Shocker: लग्नाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक; विवाह सोहळ्यानंतर दागिने घेऊन वधू गायब, तक्रार दाखल)
खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाचा खर्च वस्तू आणि सेवांमध्ये विभागलेला आहे ज्यात प्रामुख्याने कपडे, साड्या, लेहेंगा आणि इतर पोशाखांवर 10%, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवर 15%, ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि स्नॅक्स 5%, किराणा आणि भाजीपाला 5%, भेटवस्तू 4% आणि इतर वस्तूंवर 6% खर्च होईल. सेवा क्षेत्रात बँक्वेट हॉल, हॉटेल्स आणि लग्न स्थळे 5%, कार्यक्रम व्यवस्थापन 3%, तंबू सजावट 10%, खानपान आणि सेवा 10%, फ्लॉवर डेकोरेशन 4%, वाहतूक आणि कॅब सेवा 3%, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी 2%, ऑर्केस्ट्रा, संगीत इ. 3%, प्रकाश आणि आवाज 3% आणि इतर सेवा 7% असा अंदाज आहे.