Flesh-Eating Bacteria: कोलकातामध्ये मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे व्यक्तीचा मृत्यू; जाणून घ्या काय आहे हा दुर्मिळ संसर्ग

यामुळे रक्तप्रवाह थांबतो. मृण्मोयला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे त्याची प्रतिकारशक्तीही कमी झाली होती. यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता (Kolkata) येथून अत्यंत आश्चर्यकारक तशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे 29 ऑक्टोबरच्या रात्री आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 'मांस खाणाऱ्या बॅक्टेरिया'च्या (Flesh-Eating Bacteria) संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत डॉक्टरांनी सांगितले की, मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाला वैद्यकीय भाषेत नेक्रोटायझिंग फॅसिटायटिस (Necrotizing Fasciitis) म्हणतात. या प्रकारचा संसर्ग फार कमी लोकांना होतो. हे बॅक्टेरिया त्वचेखाली आणि त्याच्या ऊतींच्या खाली असतात. वेळेवर या आजाराचे निदान झाले नाही आणि उपचार लवकर सुरू केले नाहीत तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मृण्मोय रॉय असे 44 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मध्यग्रामचा रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी तो ट्रेनमधून पडला होता व यावेळी लोखंडी रॉडमुळे त्याच्या हाताला जखम झाली होती. पहिला एक आठवडा त्याच्यावर स्थानिक नर्सिंग होममध्ये उपचार करण्यात आले. जेव्हा त्याची प्रकृती गंभीर होऊ लागली तेव्हा त्याला 23 ऑक्टोबर रोजी आरजीकेएमसीएच ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

मृण्मोयवर उपचार करणारे डॉक्टर हिमांशू रॉय म्हणाले, 'रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्याच्या अंगभर विष पसरले होते. आम्ही विलंब न लावता ताबडतोब त्याला शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागात दाखल केले. येथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि उपचार सुरू केले.’ उपचारादरम्यान, डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरात नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस असल्याचे पुष्टी केली. परंतु तोपर्यंत संसर्गाने रुग्णाच्या शरीराचा बराच आणि नाजूक भाग खाल्ला होता.

हिमांशू यांनी सांगितले की, मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे रुग्णाच्या शरीरात प्रचंड संसर्ग झाला होता आणि त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. बॅक्टेरिया त्याच्या त्वचेतून पुढे शरीराच्या टिश्यूमध्ये शिरले होते. रुग्णाला मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक्स आणि इतर औषधे देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो वाचू शकला नाही. (हेही वाचा: Two-Finger Test Banned: कौमार्य चाचणीवर सुप्रीम कोर्टाकडून बंदी; असा गुन्हा करणार्‍या व्यक्तींना गैरवर्तनासाठी ठरवण्यात येणार दोषी)

डॉक्टरांनी सांगितले की, मांस खाणारे बॅक्टेरिया प्रथम रक्तपेशींवर हल्ला करतात. यामुळे रक्तप्रवाह थांबतो. मृण्मोयला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे त्याची प्रतिकारशक्तीही कमी झाली होती. यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही. अहवालानुसार, यूएसमध्ये दरवर्षी 600 ते 700 नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस प्रकरणांवर उपचार केले जातात. यापैकी 25 ते 30 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. हा संसर्ग लहान मुलांमध्ये क्वचितच होतो. ड्रग्सचे सेवन करणारे किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा लवकर संसर्ग होऊ शकतो.