Fake Drug Racket Busted: कॅन्सर बरा करण्याचा दावा, बनावट औषधे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली पोलिसांची कारवाई

या प्रकरणात गुंतलेल्या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांसह सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

Drug | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Police Bust Drug Racket: कर्करोगावर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट औषधांची विक्री (Fake Cancer Drugs) आणि कर्करोग (Cancer) बरा करण्याचा दावा करणाऱ्या एका रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गुंतलेल्या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांसह सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अँटी-फंगल म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या रिकाम्या बाटल्या आणि कॅप्सूलमध्ये आरोपी 100 रुपये किमतीचे औषध भरायचे आणि "जीवन रक्षक" कॅन्सरची औषधे म्हणून देशभर, चीन आणि यूएसमध्ये 1 ते 3 लाख रुपये प्रति कुपी विकायचे. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली.

कर्करोग रुग्णांच्या असहायतेचा आरोपींकडून फायदा

दिल्ली पोलिसांनी वायव्य दिल्लीच्या रोहिणी येथील रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह सात जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक केली आहे. या कारवाईद्वारे त्यांनी एक ड्रग रॅकेट यशस्वीपणे उद्ध्वस्त केले आहे. कर्करोगाने ग्रासलेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या असहायतेचा फायदा उठवत आरोपींनी जीवनरक्षक औषधांच्या नावाखाली बनावट कर्करोगाच्या औषधांचे उत्पादन आणि वितरण सुरु केले होते. ज्याद्वारे त्यांनी प्रचंड पैसा कमावला होता. आरोपींनी दोन वर्षांच्या कालावधीत विविध प्रदेशात 7,000 हून अधिक बनावट इंजेक्शन विकण्यात यश मिळवले. क्राईम ब्रँचने, तीन महिन्यांच्या विस्तृत तपासानंतर, दिल्ली आणि गुरुग्राममधील आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले, ज्यामुळे रोख रक्कम आणि 4 कोटी रुपयांची बनावट औषधे जप्त करण्यात आली.

डीएलएफ कॅपिटल ग्रीन्समध्ये आड्डा

विफिल जैन हा बनावट औषध विक्री रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. त्याने या रॅकेटद्वारे मोती नगर येथील डीएलएफ कॅपिटल ग्रीन्समध्ये असलेल्या दोन फ्लॅटमध्ये बनावट कर्करोगाची औषधे तयार कारण्याचा अड्डा बनवला होता. सुरज शत हा दुसरा आरोपी बनावट औषधे कुपींमध्ये भरण्याची जबाबदारी सांभाळत होता. पोलिसांनी कॅप-सीलिंग मशीन, हीट गन आणि रिकाम्या कुपीसह उत्पादन प्रक्रियेत वापरलेली महत्त्वपूर्ण उपकरणे आणि साहित्य जप्त केले. या रॅकेटमधील आणखी एक आरोपी नीरज चौहान, त्याच्या ऑन्कोलॉजी औषधांच्या ज्ञानामुळे, गुरुग्रामच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कॅन्सर इंजेक्शन्सचा साठा केला. निरज चौहानचा चुलत भाऊ तुषार, फार्मासिस्ट परवेझ आणि रुग्णालयातील कर्मचारी कोमल तिवारी आणि अभिनय कोहली यांसारख्या व्यक्तींची अटक बनावट औषधांच्या वितरणात गुंतलेले व्यापक नेटवर्क पोलीसांनी उद्ध्वस्त केले.

दरम्यान, बनावट औषधांची विक्री करत असल्याचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताच दिल्ली आणि देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आरोपींनी आणखी इतर कोणत्या आजारांच्या बनावट औषधांची विक्रीही अशाच पद्धतीने केली आहे का? याबाबतही तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.