Delhi: हॉलीवूडच्या Fast and Furious चित्रपटापासून प्रेरित होऊन तीन जणांनी चोरल्या 40 हून अधिक आलिशान गाड्या; पोलिसांकडून अटक
आरोपींनी सांगितले की, सॉफ्टवेअर-आधारित हॅकिंग डिव्हाइस वापरून, त्यांनी गाड्या अनलॉक केल्या आणि वाहनाचे सॉफ्टवेअर फॉरमॅट केल्यानंतर, डिव्हाइसच्या मदतीने नवीन सॉफ्टवेअर स्थापित केले.
'द फास्ट अँड द फ्युरियस' (The Fast and the Furious) या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित होऊन दिल्ली परिसरात तीन जणांनी स्कॅनर आणि जीपीएस जॅमरसह हाय-टेक साधनांचा वापर करून तब्बल 40 हून अधिक आलिशान कार चोरल्या आहेत. पोलिसांनी या तिघांनाही अटक केल्यानंतर याबाबत माहिती दिली. मनीष राव (42), जगदीप शर्मा (43, दोघेही उत्तम नगर येथील रहिवासी) आणि आस मोहम्मद (40, मूळ उत्तर प्रदेशातील मेरठ) अशी आरोपींची नावे आहेत.
राव आणि शर्मा एका चोरीच्या कारचा सौदा करण्यासाठी आले असता त्यांना पकडण्यात आले. ही कार पश्चिम विहार परिसरातून चोरीला गेल्याचे आढळून आले, असे पोलिस उपायुक्त (नैऋत्य) मनोज सी यांनी सांगितले. चोरलेल्या वाहनाच्या तपासणीदरम्यान सेन्सर किट, मॅग्नेट, एलएनटी की आणि आठ रिमोट कारच्या चाव्यांसह विविध उपकरणे जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या चोरीच्या गाड्यांचा मुख्य पुरवठादार मोहम्मद यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, तो या गाड्या राजस्थानमध्ये विकायचा. आरोपी 'द फास्ट अँड द फ्युरियस' या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित होते आणि काही मिनिटांत कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनर आणि कारमध्ये जीपीएस असल्यास तो अक्षम करण्यासाठी जॅमरचा वापर केला जात असे. हे तिघे कुख्यात 'रवी उत्तम नगर टोळी'चे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिन्ही आरोपींनी खुलासा केला की, त्यांनी त्यांचा नेता रवी याच्यासोबत एप्रिलपासून शहरातील उत्तम नगर, टिळक नगर, सुभाष नगर आणि पश्चिम विहार, मुनिरका, द्वारका यासह विविध भागांतून 40 हून अधिक गाड्या चोरल्या आणि राजस्थानमध्ये विकल्या. आरोपींकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, टूल किट, हॅकिंग डिव्हाइस, कारच्या 30 चाव्या, टूल्स आणि चोरीच्या सात कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा: कार, बाईक खरेदी करता आहात? 1 जूनपासून विमा महाग होण्याची शक्यता; जाणून घ्या खिशावर किती पडेल बोजा?)
आरोपींनी सांगितले की, सॉफ्टवेअर-आधारित हॅकिंग डिव्हाइस वापरून, त्यांनी गाड्या अनलॉक केल्या आणि वाहनाचे सॉफ्टवेअर फॉरमॅट केल्यानंतर, डिव्हाइसच्या मदतीने नवीन सॉफ्टवेअर स्थापित केले. त्यानंतर नवीन चाव्या तयार होत असत ज्याच्या मदतीने दोन ते तीन मिनिटांत कार चोरल्या जात असत. कार चोरल्यानंतर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा सोसायटी, रुग्णालये यांच्याजवळ त्या पार्क केल्या जात असत. मागणीनुसार ते वाहन खरेदीदारापर्यंत पोहोचवत असत, असे पोलिसांनी सांगितले.