Cytomegalovirus: कोरोना विषाणू संसर्गाचा आणखी एक दुष्परिणाम; विष्ठेद्वारे होत आहे रक्तस्त्राव, 5 रुग्णांमध्ये दिसली ‘सायटोमेगालोव्हायरस’ची लक्षणे

त्यामुळे या साथीच्या आजाराशी संबंधित अनेक नवीन लक्षणेदेखील समोर येत आहेत. आता कोरोना रूग्णांमध्ये सायटोमेगालोव्हायरस (Cytomegalovirus-CMV) म्हणजेच विष्ठेसोबत रक्त बाहेर पडण्याची लक्षणे आढळली आहेत.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

जस जसा काळ बदलत आहे, तस तसे कोरोना विषाणू (Coronavirus) आपले रूपही बदलत आहे. त्यामुळे या साथीच्या आजाराशी संबंधित अनेक नवीन लक्षणेदेखील समोर येत आहेत. आता कोरोना रूग्णांमध्ये सायटोमेगालोव्हायरस (Cytomegalovirus-CMV) म्हणजेच विष्ठेसोबत रक्त बाहेर पडण्याची लक्षणे आढळली आहेत. आतापर्यंत देशात अशी पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. अनिल अरोरा म्हणाले की, हे रुग्ण पोटदुखी आणि विष्ठेमधून रक्त निघत असल्याची तक्रार घेऊन आले होते. कोरोना संक्रमणाच्या 20-30 दिवसांनंतर रुग्णांमध्ये ही लक्षणे उद्भवली आहेत.

माहितीनुसार, कोविड संसर्गाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे- स्टिरॉइड्स रूग्णांची प्रतिकारशक्ती कमी करतात. ज्यामुळे रुग्ण इतर संक्रमणास बळी पडू शकतात. असेच एक संक्रमण म्हणजे सायटोमेगालो विषाणू. सायटोमेगालो विषाणू हा 80 ते 90 भारतीय लोकसंख्येमध्ये हानी न पोहोचवता अस्तित्त्वात आहे. आता समोर आलेल्या 5 सीएमव्ही रुग्णांमध्ये 'लो लिम्फोसाइट काउंट' (सामान्यपणे 20 ते 40 टक्क्यांच्या तुलनेत 6-10 टक्के) दिसून आला आहे. 30-70 वर्षे वयोगटातील पाच रुग्णांची प्रकरणे दिल्ली-एनसीआरमधील आहेत.

त्यापैकी दोन रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. एका पेशंटला उजव्या बाजूला कोलनची आपत्कालीन शस्त्रक्रिया आवश्यक होती. कोविडशी संबंधित इतर समस्या असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इतर तीन रुग्णांवर अँटीव्हायरल थेरपीद्वारे यशस्वीरित्या उपचार केले गेले. (हेही वाचा: Coronavirus: भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची लाट उतारास, 102 दिवसांमध्ये आकडा 40,000 हजारांनी घटला)

सध्या देशातील डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. नवीन व्हेरिएंटचे जास्तीत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. व्ही.के. पॉल म्हणाले आहेत की, आतापर्यंत असा कोणताही वैज्ञानिक डेटा उपलब्ध नाही ज्याने हे सिद्ध केले आहे की हा नवीन प्रकार अधिक संसर्गजन्य आहे किंवा लसीचा त्याच्यावर परिणाम होत नाही.