Covid-19 Vaccination in India: भारतात 17 कोटींहून अधिक लोकांनी घेतला कोविड-19 लसीचा पहिला डोस; लसीकरणात अमेरिकेला टाकले मागे

आतापर्यंत तब्बल 17.2 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून लसीकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

जानेवारीपासून भारतात कोविड-19 लसीकरण मोहिमेला (Covid-19 Vaccination Drive) सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल 17.2 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस (Vaccine First Dose) घेतला असून लसीकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत 3 जूनपर्यंत 16.9 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. कोविड-19 लसींचा पुरवठा आणि लसीकरणाचा वेग यावर सरकार करत असलेल्या प्रयत्न अधोरेखित करताना ही माहिती देण्यात आली.

कोविड-19 लसीकरणात आपण अमेरिकेलाही मागे टाकले आहे. कोरोना लसीचा पहिला डोस मिळालेल्या नागरिकांमध्ये भारत अमेरिकेहून पुढे आहे. लसीकरण मोहिमेतील सातत्य आणि तीव्रता यातून दिसून येते आणि पुढील काही दिवसांत ही मोहिम अधिक तीव्र होणार आहे, असे नीती आयोगाचे सदस्य Dr VK Paul यांनी सांगितले. (COVID-19 Vaccination in India: भारतातील कोविड-19 लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल- प्रकाश जावडेकर)

भारतातील 60 वर्षांवरील 43 टक्के नागरिक आणि 45 वर्षांवरील 37 टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 13.7 कोटी असून भारतात ही संख्या 4.4 कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या एक महिन्याआधी अमेरिकेत लसीकरणाला सुरुवात झाली. तसंच लोकसंख्येच्या बाबतीतही भारत अग्रस्थानी आहे. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी असून भारताची 138 कोटी इतकी आहे.

चीनमध्ये किती जणांना लसीचा पहिला डोस आणि दोन्ही डोस मिळाले याचा डेटा उपलब्ध नाही. मात्र चीनमध्ये अजूनपर्यंत 72.3 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. याचा अर्थ किमान 36 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस किंवा दोन्ही डोस मिळाले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या रिपोर्टनुसार, भारतात एकूण 22.75 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात कोवॅक्सिन, कोविशिल्ड लसी दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी सीरम इंस्टीट्यूटलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही लस देखील लसीकरण मोहिमेत समाविष्ट होईल. त्याचबरोबर लस निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई सोबत देखील सरकारने करार केला आहे. याचा एकत्रित परिणाम लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी होईल, अशी आशा आहे.