Ganpati Special Trains: गणपतीला कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 34 अतिरिक्त गाड्या; 8 सप्टेंबरपासून आरक्षण सुरू
गणेशभक्तांची कोकणातील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ३४ अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये ४ आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवांचा समावेश आहे.
गणेश उत्सवाच्या दिवसात चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची ओढ लक्षात घेता या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 34 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान धावणार असून, यामध्ये 4 आरक्षित विशेष सेवांचा आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान 30 अनारक्षित मेमू सेवांचा समावेश आहे.
कोकणातील गणेश उत्सव विशेष गाडी क्रमांक आणि वेळापत्रक
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर एकूण चार विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 01003 ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7.50 वाजता सुटून मडगाव येथे रात्री 11.45 वाजता पोहोचेल. ही गाडी 16 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर 2026 रोजी धावणार आहे.
गाडी क्रमांक01004 ही मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.05 वाजता पोहोचेल. ही सेवा 15 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर 2026 रोजी उपलब्ध असेल. नक्की वाचा: Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणपतीत प्रियजणांना घरी बोलावण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'आमंत्रण पत्रिका'.
गणेशोत्सव विशेष गाडीचे थांबे
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबणार आहेत.
गणेशोत्सव विशेष गाडीच्या डब्यांची रचना
गणेशोत्सव विशेष या गाड्यांमध्ये ३ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे, ८ शयनयान डबे, ६ सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ द्वितीय श्रेणी आसनासह गार्ड ब्रेक डबे असतील.
आरक्षण प्रक्रिया आणि तारखा
या विशेष गाड्यांसाठी आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
सर्वसाधारण शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग 'रेलवन' या ॲपद्वारे प्रवाशांना करता येईल. तसेच प्रवासी तिकिटांचे तत्काळ आरक्षण करण्यासाठीही 'रेलवन' ॲपचा वापर करता येऊ शकतो.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांची सविस्तर माहिती व वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.