FASTag Deadline Extended: केंद्र सरकारकडून वाहनधारकांना दिलासा; फास्टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जानेवारीपासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टॅग असणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते.

Fastag | Photo Credits: Fastag.org

चारचाकी वाहनांना फास्टॅग (FASTag) लावण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जानेवारीपासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टॅग असणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले होते. तसंच नववर्षात देशातील टोल नाक्यांवर कॅश व्यवहार होणार नसल्याने वाहनांना फास्टॅग असणे आवश्यक असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority of India) म्हटले होते. मात्र आता ही मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.

वाहनाला फास्टॅग लावल्यानंतर टोल नाक्यांवर टोल भरताना कॅश व्यवहार करावा लागणार नाही. यामुळे इंथन, वेळ या दोन्हीची बचत होईल. टोल नाक्यांच्या व्यवहारात होणारा प्रचंड गैर व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारी प्रवाशांची नाराजी यातूनच टोलसाठी नवी प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे टोलचे पैसे थेट मालकाच्या फास्टॅग अकाऊंटमधून कट होतील आणि त्याचा मेसेज मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर पुन्हा ते रिचार्ज करावे लागेल. फास्टॅगची व्हॅलिडिटी पाच वर्षांची असून त्यानंतर नवा फास्टॅग खरेदी करावा लागेल. (FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा)

फास्टॅग कसा खरेदी कराल आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती?

टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा फास्टॅग ची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. साधारणपणे सर्व नामांकित बँकांमधून, पेट्रोल पंप आणि टोलनाक्यावरुन तुम्ही फास्टॅग खरेदी करु शकता. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गाडी मालकाचं फास्टॅग अकाऊंट बनवलं जातं आणि वन टाईम टॅग डिपॉझिटची रक्कम भरल्यानंतर फास्टॅग मिळवता येईल. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, ड्रॅव्हिंग लायन्सन, आधार कार्ड आणि गाडीचे सर्व आवश्यक कागदपत्रं यांची गरज भासणार आहे.

दरम्यान, ही नवी प्रणाली फायदेशीर असून याद्वारे पुढील 2 वर्षात देशाची टोलनाक्यापासून मुक्तता करण्याचा मानस असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले होते.