निवडणूक रॅलींमध्ये भेटवस्तू म्हणून साड्या आणि शर्ट वाटपावर बंदी; Election Commission चा मोठा निर्णय

मालमत्ता मालकाने या ठिकाणी पेंटिंग किंवा पोस्टर्स लावण्याची परवानगी दिली असली तरीही राजकीय पक्षांनी तसे करू नये असे आयोगाने म्हटले आहे.

Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणूक रॅलींमध्ये भेटवस्तू म्हणून साड्या आणि शर्ट वाटपावर बंदी घातली आहे. तसेच शासकीय व निमसरकारी शैक्षणिक संस्थांच्या मैदानांचा रॅलीसाठी वापर करू नये, असेही सांगितले. शिवाय निवडणुकीच्या काळात सर्व राजकीय पक्षांना जाहिरातींसाठी समान जागा मिळावी असेही सांगितले आहे. निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कोणताही पक्ष किंवा पक्षाचे उमेदवार रॅली आणि पदयात्रेत कॅप, मास्क, स्कार्फ इत्यादी गोष्टी वापरू शकतात.

पक्ष किंवा उमेदवाराने तयार केलेले हे प्रचार साहित्य वापरण्यास मनाई असणार नाही. मात्र मेळाव्यात पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या वतीने साड्या आणि शर्टचे वाटप केले जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी जाहिरातींसाठी सर्व पक्षांना समान जागा देण्यात यावी, असेही आयोगाने म्हटले आहे. परंतु खाजगी ठिकाणी भिंतींवर मजकूर लिहिणे, पोस्टर लावणे यासारखे निर्बंध स्थानिक कायद्यानुसार पाळले पाहिजेत.

मालमत्ता मालकाने या ठिकाणी पेंटिंग किंवा पोस्टर्स लावण्याची परवानगी दिली असली तरीही राजकीय पक्षांनी तसे करू नये असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या लेखनात आणि प्रदर्शनांमध्ये समाजामध्ये असंतोष भडकावणारा किंवा चिथावणी देणारा मजकूर असू नये. (हेही वाचा: निवडणूक चिन्ह देताना पक्षपातीपणा केल्याचा Uddhav Thackeray यांचा आरोप; Election Commission ला लिहिले पत्र)

आयोगाने म्हटले आहे की, जर सार्वजनिक ठिकाणी पक्षाच्या जाहिराती दाखवण्यासाठी खास निश्‍चित केलेली जागा उपलब्ध करून दिली असेल आणि अशी जागा एखाद्या एजन्सीला वैयक्तिक ग्राहकांना त्यांच्या जाहिरातींसाठी पुढील वाटपासाठी आधीच दिली गेली असेल, तर या प्रकरणात, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना अशा जाहिरातीच्या जागेवर प्रवेशाची समान संधी आहे याची खात्री संबंधित नगरपालिका प्राधिकरणामार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी करतील.