Airfares For Prayagraj: महाकुंभसाठी प्रयागराजचा विमान प्रवास होणार स्वस्त; IndiGo ने दरात केली 30 ते 50 टक्के कपात

नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे.

IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

प्रयागराजमध्ये (Prayagraj) 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यासाठी (Mahakumbh Mela) देश-विदेशातून दररोज लाखो भाविक येत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत विमान भाड्यातही मोठी वाढ झाल्याचे दिसते. दिल्ली किंवा मुंबई ते प्रयागराजचे भाडे इतके वाढले की, त्यामाणे परदेशातील विमान प्रवास स्वस्त वाटू लागला आहे. अशा परिस्थितीत बुधवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना योग्य भाडे निश्चित करण्यास सांगितले. यानंतर देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने प्रयागराजच्या फ्लाइटच्या भाड्यात 30-50 टक्क्यांनी कपात केली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नमूद केले की, प्रयागराज फ्लाइटचे भाडे खूप वाढले असून, त्यांनी याबाबत पावले उचलण्याची विमान वाहतूक नियामक महासंचालक (डीजीसीए) यांना विनंती केली. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सचिव व्ही वूलनम, डीजीसीएचे डीजी फैज अहमद किडवाई आणि विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, महाकुंभ महोत्सवादरम्यान वाजवी भाडे राखून देशभरातून प्रयागराजला पुरेशा हवाई कनेक्टिव्हिटीचा आढावा घेण्यात आला.  भाविकांना सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी नियमित समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

विमान भाड्यात 30-50 टक्क्यांनी कपात-

आता सूत्रांनी सांगितले की, इंडिगोने प्रयागराज फ्लाइट्सचे भाडे 30-50 टक्क्यांनी कमी केले आहे. मात्र, विमान कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इंडिगोच्या वेबसाइटनुसार, 31 जानेवारीसाठी तिकीटाची किंमत 21,200 रुपये इतकी आहे आणि 12 फेब्रुवारीची सर्वात कमी किंमत 9,000 रुपये आहे. इंडिगो लखनौ, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथून प्रयागराजसाठी उड्डाणे चालवते.

प्रयागराजच्या विमानांच्या भाड्याबाबत एअर इंडिया, आकासा एअर आणि स्पाइसजेटकडूनही तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Prayagraj Maha Kumbh Mela 2025: व्हीव्हीआयपी पास रद्द, वाहन प्रवेशावर बंदी! चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज कुंभमेळ्यात 5 मोठे बदल लागू)

प्रयागराजला जाणारी उड्डाणे-

नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या देशातील विविध शहरांमधून प्रयागराजला सुमारे 80,000 मासिक सीट्ससह 132 उड्डाणे सुरू आहेत. प्रयागराज थेट आणि कनेक्टिंग फ्लाइटद्वारे 26 शहरांशी जोडलेले आहे.

दरम्यान, देशातील हवाई तिकिटांच्या किमती नियंत्रणमुक्त आहेत, म्हणजे विमान कंपन्या त्यांच्या विवेकबुद्धीनुसार भाडे वाढवू किंवा कमी करू शकतात. शाहीस्नानाला कुंभमेळ्यात जास्त लोक येत असल्याने, ही वाढती मागणी पाहून विमान कंपन्यांनी शाही स्नानावेळी विमान भाड्यात लक्षणीय वाढ केली होती. परिस्थिती अशी होती की शाही स्नानाच्या दिवशी प्रति प्रवासी भाडे 50 हजारांच्या पुढे गेले होते. हवाई भाड्यात वाढ झाल्याचे समोर आल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement