अहमदनगर: नेवासा विधानसभा मतदारसंघात मच्छिंद्र मुंगसे यांना उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे घेवून येणे पडले महागात; 5 हजारांचा दंड

उमेदवारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, उमेदवाराला अर्ज न भरताच घरी परतावे लागले आहे.

Maharashtra Election (FIle Image)

राज्य सरकारकडून (State Government) प्लास्टिकच्या वापरावर बंदी (Plastic Ban) घालण्यात आली आहे. तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईही केली जात आहे. यातच अहमदनगर (Ahmednagar) येथील नेवासा (Nevasa) तालुक्यात उमेरवारीचा अर्ज भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे घेवून येणे, मच्छिंद्र मुंगसे (Machhendra Mungese) यांना महागात पडले आहे. उमेदवारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, उमेदवाराला अर्ज न भरताच घरी परतावे लागले आहे.

अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराम मुंगसे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सोमवारी ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते 10 हजारांची नाणी आणि नोटा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन गेले होते. यामुळे प्लास्टिकचा वापर केल्यामुळे उमेदवाराच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. उमेदवाराचा मच्छिंद्र देवराम मुंगसे यांनी प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे आणल्याचे निवडणूक अधिकारी, शाहूराव मोरे यांच्या लक्षात आले. राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली असून मुंगसे यांनी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Elections 2019: भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शिक्कामोर्तब

प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यामुळे राज्य सरकारने 23 जून 2018 रोजी प्लास्टिक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारकडून योग्य कारवाई केली जात आहे. यासाठी सरकारकडून प्लास्टिक प्रतिबंध पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.