चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी साकीनाका येथून एका भाजी विक्रेत्याला अटक; 14 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
अर्थव्यवस्था, कोरोना व्हायरस (Coronavirus), जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, दळणवळण आदी क्षेत्रातही काय घटना घडामोडी घडातत यावर लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे. म्हणून आज दिवसभरातील घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट्स सोबत जोडलेले राहा.
अमरावतीत शहरातील 10 सावकारांच्या घरी सहकार खात्याच्या विशेष पथकांनी छापे मारले आहेत. या कारवाईत 18 लाख 88 हजार रुपये रोख, धनादेश आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
कोरोना व्हायरसमुळे राज्यात चिकनचा खप 300 टनांनी घटला आहे. चिकनमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे.
केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अरविंद सावंत यांची राज्यातील संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
[caption id="attachment_102217" width="512"] अरविंद सावंत यांची संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष नेमणूक[/caption]
वाराणसीत एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जामुळे त्रस्त झालेल्या एका व्यावसायिकाने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी व्यावसायिकाने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली होती.
कळना येथे रेल्वे रुळांशेजारी कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला आहे. या आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची ठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाश्यांचा गर्दीत बसलेल्या एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
जपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील कोरोनाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या क्रूझवरील एका भारतीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी सैन्याने पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युतर दिलं. मात्र, या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत. पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असताना पाकने गोळीबार केल्याने सीमा भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काँग्रेस आमदाराकडून महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली आहे. तुला तुझी लायकी दाखवते या शब्दांत आमदाराने महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडमधील कसडोलच्या काँग्रेस महिला आमदाराने 'तुला तुझी लायकी दाखवून देईन,' अशा भाषेत महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावले आहे.
औरंगाबादचं नाव कोणत्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना कधीही सरप्राईज देतील. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही, असंही खैरे यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसच्या शिदोरी या मासिकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयीच्या दोन लेखांवरून काँग्रेस व भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
रेल्वे रुळांशेजारी गवताला लागलेल्या आगीमुळे ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी वाढलेल्या गवताला आग लागली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची ठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहबाझ खान यांच्या सतरा वर्षीय मुलीला अंधेरीत मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी शाहबाझने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आठवड्यात शाहबाझवर एका मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पीडित मुलीने शाहबाझविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांचे माजी ओएसडी ( OSD) गोपाल कृष्ण माधव यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणात दिल्ली येथील विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. एएनआय ट्विट
मुंबई-पुणे इलेक्ट्रिक बसचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हॉटेल ललित येथे हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. दरम्यान, तेलावर होणारा खर्च आणि प्रदुषण याचा विचार करता इलेक्ट्रिक बस फायदेशीर ठरते. येत्या चार वर्षांच्या काळात मुंबई दिल्ली इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात यावी असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्य सरकारचे निर्णय आणि मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने यावरुन आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
एल्गार परिषदेचा तपास एनाएकडे सोपविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करुन घेतला होता. तशी माहितीही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास आपली हरकत नसल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एनआएकडे सोपविण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केव्हाही आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, असे विधान शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची भूमिका सर्वप्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतली होती. आता काही लोक ती भूमिका घेऊ पाहात आहेत. परंतू, उद्धव ठाकरे हेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचे स्वप्न पूर्ण करु शकतात, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे.
कार कंपन्यांची मुदतवाढीची याचिका फेटाळून लावत 1 एप्रिलपासून भारतात केवळ बीएस-6 वाहनांचीच विक्री करण्यात येईल' असे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाकडून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला जोरदार धक्का बसला आहे.
मुंबई ते मांडवा अशी रो-रो सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते अलिबाग हे तब्बल 4 तासांचे अंतर केवळ एक तासात कापले जाणार आहे. तसेच, नागरिकांचा वाहतुक कोंडीतून सुटकाही होणार आहे. ही सेवा फेब्रुवारी अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगभरातील अनेक लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. आज 14 फेब्रुवारी आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमिकांच्या आवडीचा खास दिवस. बोले तो व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) . व्हॅलेंटाईन डे निमित्त जगभरातील जोडपी, प्रेमी युगुलं आणि लहान थोर मंडळी आपापल्या परीने हा प्रेमाचा दिवस साजरा करतात. भारतातही लव्हबर्ड्स आज हा दिवस साजरा करत आहेत. अर्थात व्हॅलेंटाईन उत्साहाने साजरा होत असेला तरी त्याला विरोध करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष व्हॅलेंटाईनला विरोध करतात. त्यामुळे व्हॅलेंटाईन साजरा केल्याच्या आणि त्याला होणाऱ्या विरोधाच्या घटना, घडामोडी यांवर आज लेटेस्टली नजर ठेऊन असणार आहे.
अवघे जग व्हॅलेंटाईन साजरा करत आहे. दरम्यान, भारतात हा दिवस आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. पुलवामा हल्ला ( Pulwama Attack Anniversary) घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे अवघा देश आज पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. असे असले तरी, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हौतात्म्याचा सरकारला आणि विविध संस्थांना विसर पडल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळाली नाही. शहीदांच्या कुटुंबीयांना पाच एकर जमीन देण्याचा सरकारचा वादाही केवळ कागदावरच राहिला आहे. त्यामुळे आज राज्य अथवा केंद्र सरकार या निमित्ताने काही विशेष घोषणा करते का याकडेही लक्ष असणार आहे. (हेही वाचा, Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला)
दरम्यान, दुसऱ्या बाजूला दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणकूण झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर भाजपच्या गोटात मंथन सुरु झाले आहे. याचे प्रत्यंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या विधानात येते. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, दिल्लीत आपला पराभव झाल्याची कबुलीही अमित शाह यांनी दिली आहे.
दरम्यान, वरील सर्व मुद्द्यांसह अर्थव्यवस्था, कोरोना व्हायरस (Coronavirus), जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, दळणवळण आदी क्षेत्रातही काय घटना घडामोडी घडातत यावर लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे. म्हणून आज दिवसभरातील घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट्स सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)