Internet Access in India: भारतामधील ग्रामीण आणि शहरी भागातील 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही; सर्वेक्षणामधून समोर आली धक्कादायक माहिती
या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात आले होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गांचे आयोजन फायदेशीर ठरले नाही
आपल्या प्रत्येकालाच माहित आहे की कोविड-19 मुळे भारतासह अनेक देश प्रभावित झाले आहेत. या विषाणूच्या संसर्गाचा परिणाम अक्षरशः प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे. सर्वात जास्त बाधित झालेल्या या क्षेत्रांमध्ये ‘शिक्षण’ क्षेत्राचाही (Education Sector) समावेश आहे. कोरोनाव्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद होती. या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात आले होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गांचे आयोजन फायदेशीर ठरले नाही. लर्निंग स्पायरल या भारतातील एक ऑनलाइन परीक्षा सोल्यूशन प्रोव्हाईडरने याबाबत सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये असे आढळले आहे की ग्रामीण आणि शहरी भागातील भारतातील 50 टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट (Internet) उपलब्ध नाही.
सर्वेक्षणामधून समोर आलेल्या बाबी-
- केरळमधील 51 टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचली आहे परंतु केवळ 21 टक्के कुटुंबांमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे.
- त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशसारख्या राज्यामध्ये, ग्रामीण भागातील 30 टक्के कुटुंबांकडे इंटरनेटची सुविधा आहे, परंतु केवळ 2 टक्के लोकांकडेच त्यांच्या घरी ही सुविधा आहे.
- पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यात फक्त 7-8 टक्के ग्रामीण कुटुंबांना इंटरनेट उपलब्ध आहे, तर शहरांमध्ये ही सुविधा अनुक्रमे 18 आणि 21 टक्क्यांपर्यंत आहे.
- शहरात राहणाऱ्या 85 टक्के विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध आहे पण केवळ 41 टक्के लोकांकडेच त्यांच्या घरी ही सुविधा आहे.
- ग्रामीण कुटुंबातील 28 टक्के मुलांना घरात इंटरनेट सुविधा आहे.
- ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठातील 48 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात इंटरनेट उपलब्ध नाही.
ग्रामीण भागात राहणारे फक्त 42 टक्के विद्यार्थी त्यांच्या घरी वेब वापरतात. शहरी भागात राहणारे 69 टक्के विद्यार्थीच घरून ऑनलाइन गोष्टी करू शकतात. (हेही वाचा: Pariksha Pe Charcha 2021: यंदा पूर्णपणे ऑनलाईन होणार्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये innovateindia.mygov.in द्वारा कसे व्हाल सहभागी?)
यासंदर्भात लर्निंग स्पायरलचे एमडी मनीष मोहता म्हणाले की, ‘दुर्गम भागात वीज आणि इंटरनेटची सुविधा सुनिश्चित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र हे करणे गरजेचे आहे जेणेकरून संगणक आणि स्मार्टफोन सारख्या उपकरणांचा तिथे उपयोग होऊ शकेल. डिजिटल शिक्षणासाठी वीज आवश्यक आहे. इंटरनेट आणि उपकरणांचा अभाव यामुळेही विध्यार्थी डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षण घेऊ शकत नाहीत.’