या चार चोऱ्यांनी एकेकाळी हादरला होता संपूर्ण देश; विकला होता ताज महल, लाल किल्ला आणि संसद भवन
नटवरलाल इतका सराईत चोर होता की त्यांने राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीची कॉपी करून, ताज महल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि 545 खासदारांना विकले होते.
काही चोर छोट्या मोठ्या चोऱ्या करतात, पकडले जातात आणि सुटतातही. त्यांचे अपराध इतके मोठे नसतात ज्यामुळे वर्तमानपत्रांचे मथळे भरतील. मात्र काही सराईत चोर असतात, कोट्यावधी रुपयांची चोरी करूनही त्यांचा चांगपत्ता लागत नाही. नुकतेच भारतात गेल्या वर्षी बँकांची 71,500 कोटींची फसवणूक झाल्याची बातमी आली होती. सध्या सर्व गोष्टी डिजिटल झाल्याने आज हे सहजासहजी शक्य आहे, मात्र बँकांच्या या डिजिटल युगाच्या आधीही भारत काही चोऱ्यांनी पुरता हादरला होता. त्यावेळी प्रशासन, पोलिस आणि जनतेची अक्षरशः झोप उडाली होती. चला पाहूया कोणात्या होत्या या चोऱ्या
सिक्यूरिटी स्कॅम - 1991 (Securities Scam) -
हर्षद मेहता (Harshad Mehta) हे नाव आपण सर्वांनीच ऐकले असेल. सर्वसामान्य गुजराती जैन कुटुंबात जन्मलेल्या हर्षदची महत्वाकांक्षा आभाळाहुनही मोठी होती. यामुळेच शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा झाला.
हर्षद मेहता हा स्टॉक ब्रोकर होता, जो 1991 च्या बीएसई सेन्सेक्सच्या घोटाळ्यानंतर सर्वपरिचित झाला. या घोटाळ्यामधून हर्षद मेहताने इतका पैसा कमावला की, आयकर विभागाकडे त्याची निश्चित आकडेवारी नाही. विविध बँकांना मदत करण्याच्या बहाण्याने हर्षद ने आपल्या नावाचा चेक घेत इतर अनेक बँकांच्या रकमा उचलल्या होत्या. ही सर्व रक्कम त्याने शेअर बाजारात गुंतवली, आणि अचानक शेअर मार्केटने उसळी मारली. रातोरात हर्षदचे नशीब पालटले आणि तो जणू काही सेलिब्रिटी बनला. त्यानंतर त्याने इतरांनाही त्याचा पैसा ज्या कंपनीमध्ये आहे त्याच कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले. अशाप्रकारे त्याने बक्कळ माया जमवली. मात्र टाइम्स ऑफ इंडिया ची पत्रकार सुचेता दलालने हा घोटाळा उघडकीस आणला.
जेव्हा बँकांना या घोटाळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा शेअर बाजार पूर्णतः कोसळला. अनेक लोक रस्त्यावर आले, कित्येक बँकांच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. विजया बँकेच्या चेअरमन ने तर आपल्या राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी हर्षदला अटक करून शेकडो तक्रारी नोंदवल्या, मात्र फक्त 27 गुन्हे दाखल झाले. यापैकी फक्त एकाच गुन्ह्यासाठी त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली. सजा भोगत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल (Natwarlal)
भारतात नटवरलाल माहित नसेल अशी क्वचित एखादी व्यक्ती सापडेल. नटवरलाल इतका सराईत चोर होता की त्यांने राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीची कॉपी करून, ताज महल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि 545 खासदारांना विकले होते. असे सांगितले जाते की, नटवरलाल यांने समाज सेवक बनून टाटा, बिर्ला आणि धीरूभाई अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींकडूनही लाखो रुपये घेतले होते. नटवरलाल याच्याविरोधात 100 हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती, आठ राज्यांची पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर पकडल्यावर न्यायालयाने त्याला तब्बल 113 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. (हेही वाचा: एका वर्षात बँकांची तब्बल 71,500 कोटींची फसवणूक, RBI ची माहिती; नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांची नावे आघाडीवर)
ATM कांड – 2012
2012 मध्ये, काही लोकांनी पंजाब आणि केरळमध्ये ATM घोटाळे केले होते, ज्याद्वारे अनेक बँकांमधून लाखो रुपये लुटले गेले होते. ATM ला ठराविक रक्कम काढण्याचा आदेश दिल्यानंतर बाहेर आलेल्या रकमेतील थोडीच रक्कम काढली जात असत. उर्वरित पैसे ATM मध्ये परत गेल्यावर खात्यामध्ये आदेश दिलेली संपूर्ण रक्कम जमा होत असे. या तंत्राचा वापर करून, पंजाबच्या टोळीने फेडरल बँक ऑफ केरळमधून 75 लाख रुपये लुटले. जेव्हा हा घोटाळा बँकेच्या लक्षात आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. केरळ आणि पंजाब पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली. या टोळीने वेगवेगळ्या बँकांमधून 2 कोटी रुपयांची लूट केली होती.
ओपेरा हाउस चोरी – 1987 (Opera House Heist)
19 मार्च, 1987 रोजी नकली सीबीआय (CBI) बनून एका टोळीने मुंबईच्या सर्वात मोठ्या ज्वेलरी शॉपवर, ओपेरा हाउसच्या त्रिभोवनदास भीमजी झवेरी(Tribhovandas Bhimji Zaveri) वर छापा टाकला होता. सीबीआयची टीम समजून ओपेरा हाउसनेही त्यांना सहकार्य केले, मात्र यामध्ये या खोट्या टीमच्या लीडर, मोहन सिंग लाखो रुपयांचे सोने घेऊन फरार झाला होता. आश्चर्य म्हणजे पोलीस अजूनपर्यंत मोहन सिंगला पकडू शकले नाहीत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)