स्वातंत्र्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 साली सादर झाला देशाचा पहिला अर्थसंकल्प; जाणून घ्या बजेटसंबंधी काही Interesting Facts
इतक्या वर्षांत अर्थसंकल्प सादर केल्यापासून, कार्यपद्धतींमध्ये मोठा बदल झाला, बर्याच नवीन परंपरा अस्तित्त्वात आल्या आणि बर्याच नवीन गोष्टीही स्थापन झाल्या
अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) हे भारतीय जनतेसाठी फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पावर भारतातील सामान्य लोकांचे बारीक लक्ष असते. अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक दिवस त्याच्यावर चर्चा चालते. यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात काय महागले, काय स्वस्त झाले यावर अनेकांचे जीवन अवलंबून असते. म्हणूनच हा अर्थसंकल्प कोणी आणि कधी सुरु केला हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
भारतातील अर्थसंकल्पाचा इतिहास 150 वर्षांहून अधिक जुना आहे. इतक्या वर्षांत अर्थसंकल्प सादर केल्यापासून, कार्यपद्धतींमध्ये मोठा बदल झाला, बर्याच नवीन परंपरा अस्तित्त्वात आल्या आणि बर्याच नवीन गोष्टीही स्थापन झाल्या.
> 7 एप्रिल 1860 रोजी देशाचे पहिले बजेट ब्रिटिश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केले. विल्सन यांना पहिल्यांदा वित्त तज्ज्ञ म्हणून व्हायसरायच्या परिषदेत नियुक्त केले गेले. यामुळेच जेम्स विल्सन यांना भारतीय अर्थसंकल्पाचा संस्थापक देखील म्हटले जाते. पुढे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री आरके षणमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला.
> यापूर्वी मध्यवर्ती विधानसभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात, अंतरिम सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी त्यांनी लियाकत अली यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. लियाकत अली यांनी 2 फेब्रुवारी 1946 रोजी बजेट सादर केले (नंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले).
> भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प 1950-51 मध्ये सादर करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले बजेट त्यावेळी अर्थमंत्री जॉन मथाई यांनी कॉंग्रेस सरकारमध्ये सादर केले होते. 1950-51 मध्ये पहिल्यांद राज्याच्या वित्तीय योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला होता. त्यामुळे त्याची तुलना 1949-50च्या बजेटशी करू नये असा इशारा मथाई यांनी दिला होता.
> 1924 ते 1999 पर्यंत, फेब्रुवारीच्या शेवटच्या कार्यकारी दिवशी संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ही प्रथा सर बासिल ब्लॅकॅट यांनी 1924 मध्ये सुरू केली होती. 2000 मध्ये प्रथमच सकाळी 11 वाजता यशवंत सिन्हा यांनी बजेट सादर केले.
> 1948-49 च्या अर्थसंकल्पात आरके षणमुखम चेट्टी यांनी पहिल्यांदा अंतरिम हा शब्द वापरला, तेव्हापासून हा शब्द अल्पकालीन अर्थसंकल्पासाठी वापरण्यास सुरवात झाली. सीडी देशमुख हे अर्थमंत्री तसेच रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. त्यांनी 1951-52 मध्ये पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (हेही वाचा: Budget 2020: पारंपरिक 'हलवा सोहळ्या'ने अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची छपाई सुरू; जाणून घ्या काय आहे काय आहे ही परंपरा
> मोरारजी देसाई यांनी आत्तापर्यंत दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. ते सहा वेळा अर्थमंत्री असताना आणि चार वेळा उपपंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. वाढदिवसादिवशीही अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव मंत्री आहेत.
> 1973-74 च्या बजेटला काळा अर्थसंकल्प असे नाव देण्यात आले, कारण त्यात अर्थसंकल्पातील तूट (सरकारचा एकूण खर्च - सरकारचे एकूण उत्पन्न) 550 कोटी रुपये होते.
दरम्यान, भारतात जो अर्थसंकल्प बजेट प्रचलित आहे त्याची पाळेमुळे ब्रिटनमध्ये आहेत. 18 व्या शतकात ब्रिटनमध्ये वार्षिक अर्थसंकल्प प्रचलित झाला. 1733 मध्ये पंतप्रधान रॉबर्ट वॉलपोल यांनी आपल्या आर्थिक घोषणेमध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्पाचा उल्लेख केला होता.