12,000 करोड रुपयांच्या महत्वकांक्षी ‘आयुष्मान भारत योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुभारंभ
23 सप्टेंबर रोजी रांची येथून याचे अनावरण करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत योजने’चा शुभारंभ होत आहे. 23 सप्टेंबर रोजी रांची येथून याचे अनावरण करण्यात येईल. प्रभात तारा मैदानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे देशातील 10 करोड कुटुंब म्हणजेच 50 करोड लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. हा विमा 5 लाखांचा असणार आहे. सध्या ही योजना देशातील 454 जिल्ह्यांमध्ये लागू होईल.
शुभारंभाचा हा दीड तासांचा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाइव्ह दाखवला जाणार आहे. या कार्यक्रमाद्वारे योजनेचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान यामध्ये डिजिटल कँपेनचीही सुरवात करतील. या योजनेसोबतच सरकारकडून 10 लाख हॉस्पिटल्समध्ये 2.65 लाख बेड्स देखील पुरवले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 23 राज्यांनी संमती दर्शविली असून, ओडीसा, दिल्ली, पंजाब, तेलंगना, केरळ आणि कर्नाटक ही राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये ही योजना सुरु होईल.
लाभार्थींना या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 971 सेवांव्यतिरिक्त सुमारे 400 आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत.
महाराष्ट्रामधील 2011च्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून सुमारे 84 लाख कुटुंबांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार असून, पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयेदेखील सहभागी होतील. या योजनेसाठी केंद्र सरकार 60 टक्के तर 40 टक्के राज्य सरकार आर्थिक तरतूद करणार आहे.
आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील 11 वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी वर्गातील कुटुंबे समाविष्ट आहेत. ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड केली आहे.
राज्यातील 36 जिल्ह्य़ांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे 58 लाख आणि शहरी भागातून सुमारे 24 लाख कुटुंबांची निवड केली आहे. ग्रामीण भागामध्ये जळगाव, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्य़ांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे. शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे भागांमधून केली आहे.
या योजनेमध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण mera.pmjay.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता, तसेच 14555 या नंबरवर फोन करून देखील आपल्याला ही माहिती मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक नाही. कारण ही योजना पूर्णतः पेपरलेस आणि कॅशलेस असणार आहे. नॅशनल हेल्थ एजन्सीद्वारे 14000 अतिरिक्त लोकांची भरती विविध हॉस्पिटलमध्ये होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया किंवा रुग्णालयातील कोणत्याही समस्येसाठी या योजनेच्या लाभार्थींना मदत करण्यासाठी हे लोक काम करणार आहेत.