University Exams 2020: पदवी च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत घेण्याच्या UGC च्या सूचना
सध्याच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्षामध्ये काही बदल करून सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना युजीसीने दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात काही राज्यांनी कोरोना संकटात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पदवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी प्रदान करण्याच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन युजीसी म्हणजेच University Grants Commission ने अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान काल (6 जुलै) रात्री उशिरा याबाबतच एक पत्रक जारी करण्यात आलं आहे.
विद्यापीठ आणि कॉलेजला असा सल्ला दिला जात आहे की यंदाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन किंवा या दोन्हींची सांगड घालत मध्यम मार्ग काढत परीक्षा घ्याव्यात आणि पदवी दान करावी. सध्याच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्षामध्ये काही बदल करून सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना युजीसीने दिल्या आहेत.
दरम्यान 29 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या संभाव्य शैक्षणिक वर्षाच्या आणि परीक्षांच्या युजीसीच्या वेळापत्रकामध्ये परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान घेण्याची सूचना करण्यात आली होती. तर निकाल महिन्याच्या अखेरीपर्यंत लावा असेदेखील सांगण्यात आले होते. मात्र आता वाढती रूग्णसंख्या पाहता अनेक विद्यापीठांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत.
ANI Tweet
युजीसीकडून लवकरच सप्टेंबर महिन्यात कशाप्रकारे परीक्षा घेतल्या जाऊ शकतात याची गाईडलाईन जारी केली जाणार आहे. मात्र महाराष्ट्रात यापूर्वीच विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या, वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. दरम्यान अंतिम निकालावर नाखूष असणार्यांसाठी विशेष परीक्षेची सोय करून दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केली होती.
आता युजीसीच्या नव्या निर्णयाचं महाराष्ट्रासह देशभरात कसं स्वागत होतं आहे याकडेच सार्यांचे लक्ष लागले आहे.