Shivaji University, Kolhapur: युजीसीच्या कॅटेगरीमध्ये शिवाजी विद्यापीठ 'नंबर वन'; कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) अर्थातच यूजीसीने (UGC) शिवाजी विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा बहाल केला आहे

Shivaji University Kolhapur | ((Photo Credits: unishivaji.ac.in)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने (Shivaji University, Kolhapur) पाठिमागील अनेक वर्षांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्टामुळे कोल्हापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) अर्थातच यूजीसीने (UGC) शिवाजी विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा बहाल केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील केवळ दोनच विद्यापीठांना या वेळी हा दर्जा बहाल करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सावित्रिबाई फुले विद्यापीठ, पुणे अशी या विद्यापीठांची नावे आहेत. त्यामुळे आजवर ग्रामीण भागातील ग्रामीण विद्यापीठ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या याच विद्यापीठाने विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विद्यापीठाला तोडीस तोड दिल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाला नॅक मानांकनामध्ये 3.52 सीजीपीए गुणांकनासह ‘ए-प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. सहाजिकच युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा दिला गेला. याचा फायदा विद्यापीठाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. प्रामुख्याने यापुढे युजीसीकडून मिळणाऱ्या अनेक सोयीसुविधा विद्यापीठाला उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रास युजीसीने सलग पाच वर्षांसाठी मान्यता दिली आहे. आजवर दूरशिक्षण केंद्रासाठी विद्यापीठाला युजीसीकडून दरवर्षी मान्यता घ्यावी लागत असे. आता त्याची गरज नाही. एकदाच मिळालेली मान्यता पाच वर्षांसाठी असणार आहे, असी माहिती कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली आहे. (हेही वाचा, Shivaji University Kolhapur: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ‘NAAC’ मानांकनात ‘ए-प्लस प्लस’, गुणवत्तेत ठरले महाराष्ट्रात अव्वल)

विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायतत्ता देण्याचा निर्णय यूजीसीने 2018 मध्येच घेतला.त या निर्णयानुसार बंगळुरु 'नॅक'ने 3.51 सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील उर्वरीत गुणांकन प्रापत् असणार्या विद्यापीठांना श्रेणींची रचना केली. यात ‘कॅटेगरी-1’, 3.26 ते 3.50, ‘कॅटेगरी-2’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-3’ अशी ही रचना आहे. त्यात विद्यापीठाला प्रथम कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे.