'Agriculture’ Subject in School Syllabus: आता शालेय अभ्यासक्रमात होणार ‘कृषी’ विषयाचा समावेश; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय 

ग्रामीण भागातील शाळांत 50 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी शेतीवर आधारित कुटुंबातून आहेत

Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

आज महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात (School Syllabus) ‘कृषी’ (Agriculture) विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील शाळांत 50 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी शेतीवर आधारित कुटुंबातून आहेत. शेती या विषयाचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी कृषि व कृषिविषयक घटकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रालयातील बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषि शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषि शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल, त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषि संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, असे सांगून शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे शेतकरी अणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना असून या अभ्यासक्रमात शेतीशी संबंधित विविध विषयांचा समावेश होणे आवश्यक असल्याचे, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही करणार असून विद्यार्थ्यांचे वय आणि त्याची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या. (हेही वाचा: FYJC Merit List 2021: कनिष्ठ महाविद्यालयांची प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी Merit List 27 ऑगस्टला होणार जाहीर, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती)

पर्यावरणाचा समतोल राखण्याची गांभीर्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याबरोबरच जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले.