महाराष्ट्रातील 16 टक्के विद्यार्थी अजूनही फोन, टीव्ही, रेडिओपासून वंचित; राज्यात ‘ऑनलाईन शिक्षण’ सरकारसमोरील मोठी समस्या, समोर आली धक्कादायक आकडेवारी
महाराष्ट्रातील अनेक भागांत शाळा पुन्हा सुरू करणे अशक्य असल्याचे दिसून आल्याने, ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला जात आहे.
सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात तसेच सर्वसामान्यपणेही, ऑनलाईन शिक्षण (Online Education) हे सध्याच्या काळाची गरज बनले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत शाळा पुन्हा सुरू करणे अशक्य असल्याचे दिसून आल्याने, ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला जात आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील जवळपास 15.88% टक्के विद्यार्थी हे मोबाइल फोन, दूरदर्शन किंवा रेडिओपासून अजूनही वंचित आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबईत (Mumbai) जवळपास 4 टक्के विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या कम्युनिकेशनची सोय नाही व जवळील ठाणे जिल्ह्यातील 16.3% विद्यार्थ्यांची व पुणे जिल्ह्यातील 10.88% विद्यार्थ्यांची हीच परिस्थितीत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाळा बंद असतानाही शिक्षण कसे सुरू ठेवायचे याची योजना आखण्यासाठी, विभाग सर्व जिल्ह्यांमधून, मोबाईल फोन, टेलिव्हिजन किंवा रेडिओची उपलब्धता आणि वॉट्सअॅप किंवा एसएमएसची सोय याविषयी डेटा गोळा करत आहे. याबाबतचा अंतिम अहवाल येणे अजून बाकी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'आम्ही राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा उपाय योजण्याचा प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांचे शिक्षणातील सातत्य राखण्यासाठी त्यांना आनंददायक उपक्रम देऊ शकतो का, याचाही विचार चालू आहे.
मात्र, संपूर्ण राज्यात 26.1% विद्यार्थ्यांकडे स्वतःचा फोन नाही आणि ज्यांच्याकडे फोन आहे त्यांपैकी फक्त 43.6% विद्यार्थ्यांकडे व्हॉट्सअॅप आहेत आणि 30.2% विद्यार्थ्यांकडे एसएमएस सुविधा आहेत. मुंबईमधील 12.5% विद्यार्थ्यांकडे फोन नाही. कोणत्याही प्रकारच्या कम्युनिकेशनची सोय नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37.48 टक्क्यांसह पालघर जिल्हा अव्वल आहे. त्यानंतर गडचिरोली (36.23%) आणि नंदुरबार (29.87%) जिल्ह्यांचा नंबर लागतो. (हेही वाचा: गृह मंत्रालयाने जाहीर केली देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी; IIT Madras, IISc Bangalore, IIM-Ahmedabad, Miranda House, Delhi यांनी मारली बाजी)
तर अशाप्रकारे ऑनलाइन कम्युनिकेशनची सोय नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याने, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागाने ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाच्या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट आणि फोन नाहीत त्यांना घरी पाठ्यपुस्तके दिले जातील आणि विभागाने शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांशी फोनवर बोलण्यास सांगितले आहे