नोटबंदीच्या निमित्ताने भाजपच्या व्होट बँकेवर काँग्रेस मारणार डल्ला

नोटबंदी: भाजपच्या निर्णयाचा होणार काँग्रेसला फायदा?

(संपादित प्रतिमा)

२०१९ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस चांगलीच सतर्क झाली आहे. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि त्यांची टीम जोरदार कार्यरत झाली आहे. २०१४चा इतिहास पाहता भाजपला टक्कर देताना कोणतीही कसूर राहता कामा नये, यासाठी काँग्रेसकडून सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून विविध पर्यायायांवर विचार केला जात आहेत. भाजपच्या व्होट बँकेवर डल्ला मारणे हासुद्धा असाच एक पर्याय. लक्षवेधी असे की, या पर्यायासाठी भाजपच्याच निर्णयाचा आधार घेतला जाणार आहे. भाजपचा निर्णय भाजपवरच उलटविण्यासाठी नोटबंदीच्या मुद्द्याचा आधार घेतला जाणार आहे.

घरच्या मैदानावर भाजपला आव्हान...

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ आणि अभ्यासू नेते देशातील विविध शहरांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यांमध्ये हे नेते त्या त्या शहरांमधील उद्योगपतींसोबत संवाद साधतील. नोटबंदीच्या निर्णयाची झळ बसलेले उद्योजक काँग्रेसला साथ देतील, असा पक्षातील नेत्यांचा होरा आहे. काँग्रेस या दौऱ्यांची सुरुवात गुजरात आणि तामिळनाडूपासून करणार असल्याचे समजते. गुजरात हा गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गुजरातमधूनच नेतृत्व करतात. विशेष असे की, नोटबंदीच्या निर्णायनंतर भाजपला सर्वाधिक विरोध हा गुजरातमधूनच झाला होता. गुजरातसह तामिळनाडूकडेही काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. कारण, जयललीता आणि करुणानिधी यांच्या निधानंतर तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटबंदी विरूद्ध जनजागृती हे मिशन गुजरातच्या सुरत आणि तामिळनाडूच्या तिरुपूरपासून काँग्रेस राबवणार करणार आहे.

'सूरत' बदलण्यासाठी काँग्रेस मैदानात

दरम्यान, काँग्रेसने गुजरातमध्ये सूरतवरच लक्ष केंद्रीत करण्याचे आणखी कारण असे की, सूरत हे कापड उद्योग आणि हिरेबाजारासाठी जगप्रसिद्ध आहे. गेली २४ वर्षे म्हमजेच सुमारे पाच लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व राहीले आहे. याच बालेकिल्ल्यातून भाजपला नोटबंदीनंतर विरोध झाला. हा विरोधच इनकॅश करत बाजी पलटविण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. कारण, भाजपविरोधात या ठिकाणी उद्योजकांच्या मनात नाराजी असल्याचे संकेत मिळतात. दुसऱ्या बाजूला ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचीही काँग्रेससोबत स्पर्धा असणार आहे. कारण, सूरतमध्ये सुमारे सात लाखांवर उडीया समूदाय राहतो. त्यावर पटनाईकांची नजर आहे.

दरम्यान, तामिळनाडूत मोठी उलाढाल असलेले शहर म्हणजे तिरुपूर. याच शहर आणि परिसरात काँग्रेस बारीक लक्ष ठेऊन आहे. साधारण २००९ पासून आतापर्यंत या ठिकाणी एआयएडीएमकेचे वर्चस्व आहे. त्यामुळे अँटीइन्कबन्सीचा फायदा घेत मुसांडी मारण्याचा काँग्रेसचा विचार आहे.

काँग्रेसने बदलली रणनिती

दरम्यान, भाजपला टक्कर देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचाही काँग्रेसचा विचार आहे. शिवाय, केवळ नोटबंदी नव्हे तर, सरकारच्या इतर ध्येय धोरणांचा समाजातील विविध घटकांवर कसा परिणाम झाला. याचा बारकाईने विचार करून त्या त्या त्या समुहाला त्याची जाणीव करून द्यायची अशी काँग्रेसची रणनिती आहे. उदा. नोटबंदीमुळे मुंबई, सूरत, दिल्लीसह देशभरातील छोट्या उद्योजकांना फटका बसला. सरकारी धोरणामुळे शेती उद्योग आणि त्यावर अधारीत यंत्रणेला कशी झळ बसली याचा प्रचार करण्याचे तंत्र अवलंबण्याचा कांग्रेसचा विचार आहे. अर्थात, राजकीय पक्षांना जवळ वाटत असली तरी, लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहेत. त्यामुळे काँग्रेसची रणनीती कशी आकार घेते हे कळायला बराच अवधी आहे.