EC Receives Applications For EVM Verification: निवडणूक आयोगाला लोकसभेच्या 8 जागांवर ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज; कोणत्या पक्षाने केली मागणी? वाचा सविस्तर
छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. 8 जागांपैकी भाजपने 3 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या. तर 3 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवाराने विजय मिळवला.
EC Receives Applications For EVM Verification: ईव्हीएम (EVM) मध्ये छेडछाड केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह आठ उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाला (Election Commission) प्राप्त झाले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने सहा राज्यांतील लोकसभेच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये हरियाणा आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. 8 जागांपैकी भाजपने 3 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या. तर 3 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवाराने विजय मिळवला.
प्राप्त माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करणारे 8 अर्ज निवडणूक आयोगाकडे आले आहेत. यामध्ये ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. आयोग आता या 8 जागांच्या 92 मतदान केंद्रांवर ईव्हीएम तपासणार आहे. (हेही वाचा -Election commission on EVM: ईव्हीएम आणि मोबाईलचा संबंध नाही; निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण)
याशिवाय, आयोगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या 3 विधानसभा जागांच्या ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. येथील 26 मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील गैरप्रकारांची आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. हरियाणामध्ये लोकसभेच्या 2 जागांची ईव्हीएम तपासणी केली जाणार आहे. राज्यातील कर्नाल आणि फरिदाबाद या जागांची ईव्हीएम तपासणी केली जाणार आहे. कर्नालमधून केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि फरीदाबादमधून केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत अनियमितता झाल्याची भीती व्यक्त केली होती.
कर्नालमधील काँग्रेसचे उमेदवार दिव्यांशु बुद्धीराजा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएमची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी फरिदाबादमधील काँग्रेसचे उमेदवार महेंद्र प्रताप यांनीही ईव्हीएममध्ये अनियमितता झाल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - North West Mumbai Lok Sabha Result 2024: अमोल कीर्तीकरांकडून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल; कोर्टातही मागणार दाद)
तथापी, भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रांच्या मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्याकडून पराभव झाला. याशिवाय तमिळनाडूच्या वेल्लोर आणि तेलंगणाच्या जहीराबाद या जागांवरून भाजप उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे.