ब्रिटीश टीव्ही सीरिजमध्ये लवकरच झळकणार श्रिया पिळगावकर
मराठी, हिंदीनंतर आता श्रिया पिळगावकर थेट इंटरनॅशनल प्रोजेक्टचा भाग झाली आहे.
महागुरू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांची एकुलती एक मुलगी श्रिया पिळगावकरने मराठी सिनेमातून कलाक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता थेट परदेशी टीव्ही सीरिजमध्ये उडी घेतली आहे. श्रिया पिळगावकर सध्या एका ब्रिटीश टीव्ही सीरिजचा भाग आहे. लवकरच ही सीरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे.
बिचम हाऊस
ब्रिटिश सीरीज बिचम हाऊस या ब्रिटीश सीरीजचा श्रिया एक भाग आहे. या सीरीजच्या शूटिंगसाठी मागील महिन्याभरापेक्षा अधिक काळ श्रिया लंडनमध्ये आहे. लंडनमधील काही प्रसिद्ध स्टुडिओमध्ये या सीरिजचं शूटिंग सुरू आहे.
चंचल - श्रिया पिळगावकर
बिचम हाऊस या सीरिजमध्ये श्रिया 'चंचल' या तरूणीची भूमिका साकरत आहे. या भूमिकेच्या नावाप्रमाणेच ते पात्र असल्याचे श्रियाने सांगितलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्रिया शुटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित 'एकुलती एक' या सिनेमातून श्रिया रसिकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर शाहरूख खानच्या 'फॅन' चित्रपटातही श्रिया झळकली होती. मराठी, हिंदीनंतर आता श्रिया थेट इंटरनॅशनल प्रोजेक्टचा भाग झाली आहे.