अन 'या' प्रसंगानंतर सुबोध भावेचा स्वप्नांवरचा विश्वास वाढला
सुबोध भावेने शेअर केला हा खास फोटो
अभिनेता सुबोध भावे अनेक दिवसांनी मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा परतला आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ' तुला पाहते रे' ही झी मराठीवरील मालिका लोकप्रिय होते.
अवखळ, अल्लड ईशा आणि श्रीमंत, समजूतदार विक्रम सरंजामे यांच्यामधील केमेस्ट्री लोकांच्या पसंतीला उतरत आहे. ईशा म्हणजे गायत्री दातार 'तुला पाहते रे..' मुळे प्रकाश झोकात आली असली तरीही यापूर्वी सुबोध आणि गायत्रीची अनेक वर्षांपूर्वी भेट झाली होती.
सुबोधने शेअर केली खास पोस्ट
सुबोध भावेने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास कोलाज केलेला फोटो शेअर केला आहे. यामधील चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून ईशा म्हणजेच गायत्री दातार आहे. एका कार्यक्रमादरम्यान गायत्रीला सुबोधच्या हस्ते बक्षीस मिळाले होते.
शब्द झाले खरे ....
लहानपणी गायत्रीने सुबोधच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना भविष्यात तुमच्यासोबत काम करण्याची ईच्छा बोलून दाखवली होती. आता ते स्वप्न प्रत्याक्षात उतरलं आहे. गायत्रीने या प्रसंगाची आठवण करून दिल्याचं सुबोध भावेने म्हटलं आहे. 'दुनिया गोल आहे' म्हणत, या प्रसंगानंतर माझा स्वप्नांवरचा विश्वास अजून वाढला आहे. असे सुबोधने म्हटले आहे.
तुला पाहते रे
तुला पाहते रे या मालिकेमध्ये गायत्री ईशाचं पात्र साकारत आहे तर सुबोध विक्रम सरंजामे हा उद्योगपती साकारत आहे. या दोघांमध्ये वयाचं अंतर मोठं आहे. मात्र वयाचं बंधन पार करून या दोघांची प्रेमकहाणी पुढे कशी सरकते? त्यांच्या निर्णयाचा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक संबंधांवर कसा प्रभाव पडतो ? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.