Ram Charan ने वाढदिवसानिमित्त शेअर केला RRR चित्रपटातील खास लूक; पहा फोटो
पोस्टरवर राम चरण एका पौराणिक योद्धाच्या शैलीत आकाशाकडे धनुष्य लावताना दिसत आहे.
बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ (RRR Movie) हा चित्रपट या वर्षाच्या सर्वाधिक प्रतीक्षेत चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अजय देवगण आणि आलिया भट्टही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसतील. राम चरणने त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या चित्रपटातील त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शुक्रवारी राम चरणने आपल्या अल्लुरी सीता रामराजू या पात्राची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली. पोस्टरवर राम चरण एका पौराणिक योद्धाच्या शैलीत आकाशाकडे धनुष्य लावताना दिसत आहे. राम चरणचा हा लूक अत्यंत प्रभावी दिसत आहे. राम चरणने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'शौर्य, सन्मान आणि अखंडता. एक व्यक्ती ज्याने हे सर्व परिभाषित केले. #AlluriSitaRamaraju ही भूमिका साकारणे हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.' (वाचा - Parel Rawal Tested COVID-19 Positive: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी घेतला होता कोरोनाचा पहिला डोस)
यापूर्वी आलिया भट्टने आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेची झलक शेअर केली होती. आरआरआर हा एक पीरियड चित्रपट आहे, ज्याची पार्श्वभूमी ब्रिटिश राजवटीच्या काळात सेट केली गेली आहे. चित्रपटाच्या कथेच्या मध्यभागी अल्लुरी सीता रामराजू आणि कोमारम भीमा असे दोन स्वातंत्र्यसेनानी आहेत. दोघांनीही आदिवासींसाठी निजामाच्या राजवटीविरूद्ध युद्ध केले. त्यांनी गनिमी युद्धाचा अवलंब केला आणि नंतर ते ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना शहीद झाले.
या चित्रपटाचे पूर्ण नाव Roudram Ranam Rudhiram आहे. मुळात तेलगूमध्ये तयार होत असलेला आरआरआर चित्रपट हिंदीसह 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा एक मेगा बजेट चित्रपट आहे, ज्याचे बजेट 350-400 कोटी आहे. केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्स खरेदी करण्यासाठी निर्मात्यांना 350 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर आल्याची बातमी होती. आरआरआर दसऱ्यानिमित्त 13 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध विदेशी कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.