Video- Sky Bus In India Soon: भारतात लवकरच सुरू होणार हवेत चालणारी 'स्काय बस'; जाणून घ्या कोणत्या शहरांचा लागू शकतो नंबर
शिवाय, त्याची रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमी वापर करत असल्याने, देशाच्या गतिशीलतेच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मौल्यवान भर पडते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशातील नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी uSky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि अनुभव केंद्राला (Certification and Experience Center) भेट दिली.
प्रागहून भारताकडे येताना गडकरी यांनी युएईच्या शारजाह येथे सुरक्षिततेचा अनुभव घेण्यासाठी स्काय बसची चाचणी घेतली. यावेळी त्यांनी स्काय बसमधून प्रवास केला. uSky टेक्नॉलॉजीने स्काय बस सोल्यूशन्स विकसित केले आहेत आणि ही या मोबिलिटी सेवा भारतात आणण्यासाठी iSky Mobility ने uSky सोबत करार केला आहे.
स्काय बस सेवा ही शहरी रहिवाशांना प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करून शाश्वत, गर्दी-मुक्त शहरी गतिशीलता समाधान देते. शिवाय, त्याची रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमी वापर करत असल्याने, देशाच्या गतिशीलतेच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मौल्यवान भर पडते. हे तंत्रज्ञान बेंगळुरू, पुणे, नागपूर आणि दिल्ली यांसारख्या भारतीय शहरांमध्ये प्रभावी ठरेल आणि ते लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा: 1st Green Hydrogen Fuel Cell Bus: सुरु झाली देशातील पहिली हरित हायड्रोजन इंधन सेल बस; Minister Hardeep S Puri यांनी दाखवला हिरवा झेंडा, जाणून घ्या काय असेल खास)
प्रदूषण आणि रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी मोदी सरकार देशातील इतरही अनेक शहरांमध्ये स्काय बसेस चालवण्याचा विचार करत आहे. याआधी नितीन गडकरी म्हणाले होते, भारतासारख्या देशासाठी आर्थिक विकास आवश्यक आहे, मात्र त्यासाठी पर्यावरणाशी तडजोड करता येणार नाही. देशातील सतत वाढत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी स्काय बस ही चांगली योजना ठरू शकते.
यासह गडकरी यांनी प्राग, चेक प्रजासत्ताक येथे स्कोडा द्वारे हायड्रोजन बसचीदेखील चाचणी घेतली. हायड्रोजन बसेस कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करत स्वच्छ आणि हिरव्या भविष्यात मोठे योगदान देतात.