Vijay Mallya Extradition: विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबले? अजून एक कायदेशीर प्रश्न सोडवणे बाकी असल्याचे यूके हाय कमिशनचे म्हणणे

हायकोर्टाच्या या धक्क्यानंतर, अशी आशा व्यक्त केली जात होती की

Vijay Mallya | (Photo Credits: PTI/File)

मद्य व्यावसायिक (Liquor Baron) आणि किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्या (Vijay Mallya) याचा अपील बुधवारी ब्रिटिश हायकोर्टाने (British High Commission) फेटाळला. हायकोर्टाच्या या धक्क्यानंतर, अशी आशा व्यक्त केली जात होती की, काही दिवसांत मल्ल्याला भारतात आणता येईल कारण त्याच्याकडे प्रत्यर्पण टाळण्यासाठी कायदेशीर पर्याय उरला नाही. मात्र आता विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात यूके हाय कमिशनने म्हटले आहे की, आणखी एक कायदेशीर प्रश्न सोडविणे बाकी आहे, व तो गोपनीय आहे. यानंतर आता मल्ल्याच्या भारतात येण्याच्या आशा मावळल्या आहेत.

लंडन हायकोर्टाने विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या परवानगीस नकार दिला आहे. गेल्या महिन्यात, यूके हायकोर्टाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेसाठी विजय मल्ल्याकडे 14 दिवसांचा कालावधी होता. लंडन हायकोर्टाने गेल्या महिन्यात 20 एप्रिल रोजी हा निकाल दिला होता. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, विजय मल्ल्याने भारतीय बँकांची फसवणूक केली आहे आणि त्यांचे प्रत्यार्पण करावे. (हेही वाचा: विजय मल्ल्याला भारतात आणले जाणार; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होण्याची शक्यता)

एएनआय ट्वीट -

त्यानंतर मल्ल्याने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटच्या लोअर कोर्टाच्या प्रत्यार्पणाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, पण तिथेही त्याला धक्का बसला. हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर युकेच्या गृहसचिवांना विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कागदावर 28 दिवसांत सही करणे गरजेचे आहे. त्यानंतर लंडनचे होम ऑफिस भारतीय अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करेल. अशा परिस्थितीत विजय मल्ल्याला 28 दिवसांत भारतात आणले जाण्याची अपेक्षा होती, पण आता यूके हाय कमिशनने भारताला एक धक्का देत, अजून एक कायदेशीर प्रश्न निकाली काढणे बाकी आहे, व तो गोपनीय असल्याचे म्हटले आहे.