Twitter: ट्विटरचे शेअरहोल्डर सौदी प्रिन्सने Elon Musk ची ऑफर फेटाळली; जाणून घ्या टेस्लाच्या सीइओची प्रतिक्रिया
सौदी अरेबियाचे हाय-प्रोफाइल गुंतवणूकदार प्रिन्स अल वालीद बिन तलाल अल सौद हे किंगडम होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील अनेक खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये भागधारक आहेत.
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter) 54.20 डॉलर प्रति शेअर किंमतीला कंपनी विकत घेण्याची ऑफर दिली आहे. मात्र ट्विटरमध्ये गुंतवणूकदार असणारे सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वालीद बिन तलाल अल सौद (Al Waleed bin Talal Al Saud) यांनी इलॉन मस्कची ऑफर नाकारली आहे. अल वलीद बिन तलाल यांनी म्हटले आहे की इलॉन मस्कची मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकत घेण्याची ऑफर खूप कमी आहे.
अल वलीद बिन तलाल यांनी 15 एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांची ऑफर फेटाळली. त्यांनी ट्विट केले की, ‘मला वाटते इलॉन मस्क यांनी प्रस्तावित केलेले 54.20 अब्ज डॉलर्स हे ट्विटरची सध्याची वाढ आणि पुढील शक्यता लक्षात घेता खूपच कमी आहेत.’ ते पुढे लिहितात की, ‘ट्विटरच्या सर्वात मोठ्या आणि दीर्घकालीन भागधारकांपैकी एक म्हणून किंगडम होल्डिंग कंपनी आणि मी इलॉन मस्कची ही ऑफर नाकारतो.’
इलॉन मस्क यांनी याबाबतच्या प्रत्युत्तरादाखल एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारले आहेत- ‘1. ट्विटरमध्ये किंग्डमचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग किती आहे? आणि 2. पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल किंग्डमचे मत काय आहे?’ पत्रकारिता स्वातंत्र्याच्या बाबतीत सौदी अरेबिया सर्वात खालच्या देशांमध्ये येतो. याठिकाणी देशावर टीका करणारे अनेकदा तुरुंगात जातात, हे जगजाहीर आहे.
यापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या बोर्डात सहभागी होण्याची ऑफर नाकारली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. इलॉन मस्क यांनी कंपनीच्या भागधारकांसाठी बोली लावताना सोशल मीडियावर आपली ऑफर जाहीर केली. इलॉन मस्क यांनी ट्विटरला 41 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मस्कच्या या ऑफरनंतर, प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरच्या स्टॉकमध्ये 12% वाढ होत आहे. परंतु आता ट्वीटरच्या शेअरहोल्डरने ही ऑफर नाकारली आहे. (हेही वाचा: आता What's App वर मिळवू शकता अंधेरी-घाटकोपर मेट्रोचे ई-तिकीट; जाणून घ्या फायदे व प्रक्रिया)
दरम्यान, सौदी अरेबियाचे हाय-प्रोफाइल गुंतवणूकदार प्रिन्स अल वालीद बिन तलाल अल सौद हे किंगडम होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील अनेक खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये भागधारक आहेत. अल वालीदची ट्विटर, सिटीग्रुपसह अनेक हॉटेल चेनमध्ये भागीदारी आहे. प्रिन्स अल वालीदची एकूण संपत्ती 16.4 अब्ज डॉलर (1251 अब्ज रुपयांहून अधिक) आहे. अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मासिकाने 2008 मध्ये जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक यादीत त्यांचा समावेश केला होता.