Coronavirus Vaccine ची निर्मिती करण्यात इतक्यातच यश येईल याची शाश्वती नाही; जागितक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ David Nabarro यांची माहिती
नाबोरो हे जगातील आघाडीचे तज्ज्ञ आहेत.
पुढील काही महिन्यात कोरोना व्हायरसच्या लसीची निर्मिती करण्यात यश येईल असे ठामपणे सांगता येत नाही, अशी जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) तज्ज्ञ डेव्हिड नाबारो (David Nabarro) यांनी दिली आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना कोरोना संकटाच्या भीतीखाली पुढील काही काळ राहावे लागणार असून त्यानुसार त्यांना आपले जीवनमान बदलावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. नाबोरो हे जगातील आघाडीचे तज्ज्ञ आहेत. (सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूवर लस उपलब्ध होणार? ब्रिटनमधील Oxford विद्यापीठातील प्राध्यापकांचा दावा)
एका मुलाखतीत नाबारो यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरसवर लस लवकरच विकसित होईल अशा भ्रमात लोकांनी राहू नये. अशी एक लस बनवू शकत नाही जी सर्व आजारांवर उपयुक्त ठरेल. काही व्हायरस असे असतात की त्यांच्यावर लस शोधणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे येत्या काळात लोकांना या व्हायरसच्या भीतीखाली जगावे लागणार आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात अशा लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवणे योग्य ठरेल. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात हॉस्पिटल्सची संख्या देखील वाढवावी लागेल. आता पर्यंत कोविड 19 च्या वेगवेगळ्या 44 लसी विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी एक यशस्वी लस शोधण्यासाठी 12-18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो."
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस वरील 42 लसी या प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत आणि 2 लसी फेज 1 पर्यंत पोहचल्या आहेत. या दोन लसींच्या क्लिनिकल ट्रायल्स या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. या क्लिनिकल ट्रायल्स यशस्वी झाल्या तर या लसी लोकांसाठी 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होतील.
जगात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे 19 एप्रिल, रविवार सकाळपर्यंत संपूर्ण जगभरात तब्बल 2,329,651 रुग्ण आढळून आले आहेत. तर 160,721 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.