Prince Harry आणि पत्नी Meghan Markle आता शाही राजघराण्याचे सदस्य म्हणून परतणार नाहीत, काढून घेतले सर्व विशेषाधिकार; Buckingham Palace ने केली पुष्टी
बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ससेक्सचे राजकुमार आणि प्रिन्सेस यांनी राणीला सांगितले आहे की, ते राजघराण्याचे कार्यकारी सदस्य म्हणून परत येत नाहीत
ब्रिटनचे राजकुमार हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल (Meghan Markle) आता शाही राजघराण्याचे सदस्य म्हणून परत येणार नाहीत. क्वीन एलिझाबेथ II यांनी या निर्णयाबद्दल त्या दोघांनाही माहिती दिली आहे. शुक्रवारी बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली आहे. ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सने सुमारे एक वर्षापूर्वी शाही जबाबदारीमधून मुक्त होण्याची घोषणा केली होती. या दोघांनी राजघराण्याशी संबंध तोडण्याच्या सुरुवातीच्या घोषणेला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी अमेरिकेतील अनेक उद्योगांमध्ये सामील होऊन आता कॅलिफोर्नियामध्ये राहून नवीन जीवन सुरु केले आहे.
2020 च्या सुरुवातीच्या काळात राणीशी झालेल्या बैठकीत हॅरीने एका वर्षामध्ये राजघराण्यापासून दूर जाण्याच्या निर्णयाचा आढावा घेण्यास सहमती दर्शविली. आता 94 वर्षाच्या महारानीने त्यांना या निर्णयाबद्दल लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आता हे दोघेही परत येणार नसल्याने त्यांची सर्व मानद लष्करी नेमणुका आणि राजेशाहीची पदे राजघराण्यातील अन्य कार्यरत सदस्यांमध्ये वाटली जातील. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ससेक्सचे राजकुमार आणि प्रिन्सेस यांनी राणीला सांगितले आहे की, ते राजघराण्याचे कार्यकारी सदस्य म्हणून परत येत नाहीत. (हेही वाचा: UK Economy: कोरोना विषाणूमुळे इंग्लंडची अर्थव्यव्यवस्था कोलमडली; 1709 नंतरची सर्वात मोठी घट)
निवेदनात असे म्हटले आहे की, ‘राणीने त्यांना लिहिले आहे की रॉयल फॅमिलीच्या कार्यांपासून दूर राहिल्यामुळे सार्वजनिक सेवेच्या जीवनात येणाऱ्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये चालू ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व उपाधी आणि सनद काढून घेतले जातील.’ राजघराण्यातील तज्ज्ञांच्या मते, बकिंगहॅम पॅलेसमधील या दोघांचेही कार्यालय 31 मार्चपासून अधिकृतपणे बंद होईल. याद्वारे दोघांच्या संरक्षणासाठी असलेले सुरक्षा रक्षकदेखील काढून घेतले जातील. त्या दिवसानंतर या दोघांचेही सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन सुरु होईल. स्वतःच्या सर्व आर्थिक बाबीही या दोघांच्या दोघांना सांभाळाव्या लागतील.