Pfizer ची कोरोना विषाणू लस ठरत आहे कुचकामी? इस्त्राईल मध्ये Vaccine घेतल्यानंतर 12,000 लोकांना Coronavirus ची लागण
यासह सध्या तिथे तिसरे लॉकडाउन सुरू असूनही, कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. फायझर लस जर्मन भागीदार बायोएनटेकच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे आणि अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन आणि युरोपियन संघाने आपत्कालीन वापरास त्याला मान्यता दिली आहे
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरण चालू आहे. लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये याचे दुष्परिणाम दिसून आले आहेत, तर काही ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. इस्त्रायलच्या (Israel) सरकारने फायझर आणि बायोएनटेक (Pfizer/BioNtech) यांच्याबरोबर लसीबाबत करार केला असून, तीच लस देशात दिली जात आहे. इस्रायलमध्ये ही लस घेतल्यानंतरही, कोरोनाचा संसर्ग लोकांमध्ये कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतरही 12,400 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. खास गोष्ट म्हणजे, यापैकी 69 लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने फायझरच्या कोविड लसीचे शॉट घेतल्यानंतर 1,80,000 पेक्षा जास्त लोकांची चाचणी केली. त्यानंतर इस्रायलच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे की कोरोना लसीकरणानंतरही देशातील 6.6 टक्के लोक कोरोना विषाणूला बळी पडले आहेत. यापूर्वी कोरोना साथीचे राष्ट्रीय समन्वयक नेटमॅन एश म्हणाले होते की, फायझरची कोराना लस तितकी प्रभावी नाही जितकी आम्हाला अपेक्षित होती. इस्रायलमध्ये कोरोना लस मोहिमेला 19 डिसेंबरपासून सुरुवात झाली. आतापर्यंत देशातील सुमारे 25 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे व 3.5 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, इस्त्रायली सरकारने फायझर आणि बायोएनटेक यांच्याबरोबर 8 दशलक्ष कोरोना लस डोससाठी एक करार केला होता. (हेही वाचा: Corona Vaccination: कोरोना विषाणू लसीकरणानंतर तब्बल 23 लोकांचा मृत्यू; Pfizer च्या लसीचे गंभीर दुष्परिणाम)
इस्त्राईलमध्ये लसीकरण झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे. यासह सध्या तिथे तिसरे लॉकडाउन सुरू असूनही, कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. फायझर लस जर्मन भागीदार बायोएनटेकच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे आणि अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन आणि युरोपियन संघाने आपत्कालीन वापरास त्याला मान्यता दिली आहे. असे सांगितले जात आहे की फायझरची लस 95 टक्के प्रभावी आहे. दरम्यान, याआधी फायझर कोविड-19 लस दिल्यानंतर 13 जणांना चेहऱ्याचा अर्धांगवायू (Facial Paralysis) झाल्याची घटना इस्त्राईलमध्ये घडली आहे.