Pakistan Economic Crisis: 'भारत महासत्ता बनत आहे, तर आम्ही भीक मागत आहोत'; पाकिस्तानच्या मंत्र्याचा संसदेत शाहबाज सरकारवर निशाणा (Watch Video)

या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल तेथील विरोधी पक्ष नेते विचारत आहेत. यासाठी पाकिस्तानची तुलना भारताशी केली जात आहे.

India, Pakistan flags (Photo Credits: PTI)

गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानची (Pakistan) दिवाळखोरीकडे वाटचाल सुरु आहे. मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने पाकिस्तानने अनेक देशांकडे मदतीची याचना केली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) द्वारे आशेचा किरण दिसला आहे, ज्यामुळे काही दिवसांसाठी तरी पाकिस्तानची स्थिती सुधारू शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्डाने बेलआउट पॅकेज अंतर्गत पाकिस्तानला US$ 1.1 अब्ज कर्ज मंजूर केले आहे.

दुसरीकडे खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानमधील नेत्यांचे सूरही बदलू लागले आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल तेथील विरोधी पक्ष नेते विचारत आहेत. यासाठी पाकिस्तानची तुलना भारताशी केली जात आहे.

पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आणि जेयुआय-एफ (JUI-F) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी भारताचे कौतुक करताना आपल्याच देशातील शाहबाज सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणादरम्यान मौलाना रहमान म्हणाले की, ‘भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले. आता एकीकडे भारत महासत्ता बनण्याचा मार्गावर आहे, दुसरीकडे आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी जगात भीक मागत आहोत.’ याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी शाहबाज सरकारला केला. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करताना मौलाना फजलुर रहमान यांनी हे भाष्य केले. (हेही वाचा: Kidnapped Judge in Pakistan: पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या न्यायाधीशाची सुखरूप सुटका; घटनास्थळावरून वाहन जप्त)

पहा व्हिडिओ-

मौलाना म्हणाले, ‘पडद्याआडून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आहेत, ज्यांनी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना कठपुतळी बनवले आहे. या शक्ती आपल्याला भिंतींच्या आडून नियंत्रित करतात. संसदेतील सदस्य तत्त्वे सोडून लोकशाही विकण्यात व्यस्त आहेत.’ 2018 आणि 2024 च्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा त्यांनी निषेध केला. यंदा 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुका निष्पक्ष नसून सदोष असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अहवालानुसार, 2024 मध्ये पाकिस्तानला देश चालवण्यासाठी 40 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की, पाकिस्तानला यावर्षी व्याजासह 30 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सतत कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे.