Pakistan Bankrupt: पाकिस्तान झाला 'दिवाळखोर'; संरक्षण मंत्र्यांनी जाहीरपणे केले मान्य, म्हटले- 'आता जमिनी विकण्याशिवाय कोणताच पर्याय नाही'

पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली एवढा दबला आहे की, आता कोणताही देश त्याला कर्ज द्यायला तयार नाही. आयएमएफने त्याला कर्ज देण्यास नकार दिला आहे.

Pakistan PM Shehbaz Sharif

पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश दिवाळखोर (Bankrupt) झाला आहे. त्यामुळे आता जमीन विकण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. महागड्या सरकारी जमिनीवर बांधलेले दोन गोल्फ क्लब विकल्यास पाकिस्तानचे एक चतुर्थांश कर्ज फेडता येईल, असे त्यांनी सुचवले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की देश आधीच दिवाळखोर आहे आणि देशाच्या समस्यांचे निराकरण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे नाही तर देशातच आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीसाठी त्यांनी संस्था, नोकरशाही आणि राजकारण्यांना जबाबदार धरले.

आसिफ म्हणाले की, मी 33 वर्षांपासून संसदेत आहे आणि 32 वर्षांत देशाचे राजकारण बदनाम होताना पाहिले आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, असिफ यांनी निदर्शनास आणून दिले की, जे गोल्फ क्लब सरकारी जमिनीवर बांधले गेले आहेत त्यापैकी दोन विकल्यास पाकिस्तानचे एक चतुर्थांश कर्ज कमी होईल. यावेळी त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की सुरक्षा यंत्रणा या समस्येचा सामना करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांना देशात स्थायिक होण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या देशात दहशतवाद्यांना स्थायिक होण्याची संधी दिल्याचे उघडपणे मान्य केले आहे. मात्र आतापर्यंत पाकिस्तान हे स्वीकारण्यास टाळाटाळ करत होता. पण आता खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीच हे वक्तव्य करून भारताचे दावे सिद्ध केले आहेत, ज्यात पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा पुरस्कर्ता असल्याचे अनेकदा म्हटले आहे. (हेही वाचा: तालिबानने घातली गर्भनिरोधकांवर बंदी, म्हटले- 'हे मुस्लिमांची लोकसंख्या रोखण्याचे पश्चिमी देशांचे षडयंत्र')

दरम्यान, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने काही धाडसी निर्णय घ्यावेत आणि काटकसरीचे उपाय लागू करावेत, अशी भूमिका विरोधकांनी मांडली आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, नवीन अर्थसंकल्पीय उपायांमुळे महागाई वाढेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली एवढा दबला आहे की, आता कोणताही देश त्याला कर्ज द्यायला तयार नाही. आयएमएफने त्याला कर्ज देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे आता ना पैसा आहे ना कर्जदार.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif