Mass Grave: डिपार्टमेंट स्टोअरच्या खाली सापडले 300 सांगाडे; निम्मे अवशेष लहान मुलांचे, परिसरात खळबळ
सध्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे पथक सांगाड्यांचा पुढील शोध घेत आहे.
युनायटेड किंगडममधून (UK) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील पेमब्रोकशायर येथील एका जुन्या फूड डिपार्टमेंट स्टोअरच्या इमारतीखाली 307 सांगाडे (Skeletons) सापडले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेले सांगाडे नक्की कोणाचे आहेत. काही लोकांनी याला एक मोठी कबर असे म्हटले आहे. या इमारतीत बांधकाम सुरू होते, त्यादरम्यान कामगारांना हे सांगाडे मिळाले.
डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, हॅवरफोर्डवेस्ट, पेम्ब्रोकशायर, वेल्स येथे एक डिपार्टमेंटल स्टोअर होते, जे पाडून नवीन बार बांधला जात होता. फरशा टाकण्यासाठी जमीन तयार करत असताना अचानक जमिनीच्या आत (डिपार्टमेंटल स्टोअर बारच्या खाली) सांगाडे दिसू लागले. लगेच कामगारांनी जागा रिकामी केली आणि पुरातत्व विभागाच्या लोकांना पाचारण करण्यात आले.
पुरातत्व शास्त्रज्ञ घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. 300 सांगाड्यांपैकी निम्मे अवशेष लहान मुलांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, ही 600 वर्षांहून अधिक जुनी एक प्राचीन स्मशानभूमी असावी. ज्या ठिकाणी सांगाडे सापडले आहेत ते युद्धात मारले गेलेले सैनिक आणि सामान्य लोकांच्या दफनभूमीचे ठिकाण असावे असा दावा तज्ञांनी केला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी दावा केला की, हे सांगाडे 15 व्या शतकातील आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, 15 व्या शतकाच्या सुरुवातीला वेल्श प्रिन्स ओवेन ग्लिंडरने शहरावर आक्रमण केल्यानंतर या ठिकाणी सामूहिक कबर बांधण्यात आली असावी असा एक सिद्धांत आहे. त्याच वेळी, मेलऑनलाइनच्या अहवालानुसार, 18 व्या शतकापर्यंत ही जागा दफनासाठी वापरली गेली असल्याची शक्यता आहे. साइट पर्यवेक्षक अँड्र्यू शूब्रूक यांनी सांगितले की, जेव्हा 1405 मध्ये ओवेन ग्लिंडरने शहरावर आक्रमण केले होते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक मारले गेले होते. (हेही वाचा: देव तरी त्याला कोण मारी! नवऱ्याने पत्नीला जिवंत जमिनीत पुरले; Apple Watch च्या मदतीने असा वाचला जीव)
यातील अनेक सांगाड्यांच्या कवटीवर खोल जखमा आहेत आणि शरीराच्या इतर हाडांवर धातूने जखमा झाल्याच्या खुणा आहेत. सध्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे पथक सांगाड्यांचा पुढील शोध घेत आहे. नंतर या सांगाड्यांना जवळच्या योग्य ठिकाणी पुन्हा पुरण्यात येईल.