Jail For Heart Emoji: आता 'या' देशांमध्ये महिलांना 'हार्ट इमोजी' पाठवणे ठरणार गुन्हा; होऊ शकते दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
सौदी अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोताज कुत्बी यांनी सांगितले की, जर एखाद्या महिलेने ऑनलाइन संभाषणादरम्यान वापरलेल्या इमोजी किंवा चित्रांवर खटला दाखल केला तर ज्या व्यक्तीने अशा गोष्टी पाठवल्या आहेत, त्याला शिक्षा होऊ शकते.
आजकाल सोशल मीडियावर लोक आपले मित्र किंवा नातेवाईकांशी बोलताना भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा (Emoji) वापर करतात. चॅट दरम्यान, इमोजीद्वारे स्वतःला व्यक्त करणे ही खूप सामान्य बाब आहे. अनेकदा संवाद साधताना खूप शब्दांपेक्षा फक्त काही इमोजीमधूनही आपल्या मनातील गोष्टी मांडता येऊ शकतात. चॅट करताना काही लोक प्रेम किंवा आपुलकी व्यक्त करण्यासाठी हार्ट इमोजी (Heart Emoji) पाठवतात. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हार्ट इमोजी पाठवणे हे काही देशांमध्ये गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकते आणि त्यासाठी तुरुंगातही जावे लागू शकते.
आखाती देश कुवेत आणि सौदी अरेबिया या दोन इस्लामिक देशांमध्ये आता एखाद्या महिलेला हार्ट इमोजी पाठवणे ही मोठी समस्या ठरू शकते. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जे पुरुष महिलांना हार्ट इमोजी पाठवतील त्यांना आता दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा व्हॉट्सअॅपवर महिला किंवा मुलीला हृदयाच्या आकाराचे इमोजी पाठवल्यानंतर तिने तक्रार केल्यास हा गुन्हा मानला जाईल. ही गोष्ट स्वैराचाराला उत्तेजन म्हणून पहिली जाईल.
या गुन्ह्याखाली दोषी आढळल्यास आरोपीला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. एवढेच नाही तर त्याच्यावर 2000 कुवेती दिनार (सुमारे 5.38 लाख रुपये) दंडही ठोठावण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपवर 'हार्ट इमोजी’ पाठवणे' सौदी अरेबियामध्ये आधीच बेकायदेशीर आहे. येथे यासाठी 2 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. हा नियम फक्त कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच लागू आहे. (हेही वाचा: Woman Captive As 'Sex Slave' for 14 Years: महिला अंधारकोठडीत 'सेक्स स्लेव्ह' म्हणून 14 वर्षे बंदिस्त; 1,000 वेळा बलात्कार झाल्याचा आरोप, आरोपीला अटक)
सौदी अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोताज कुत्बी यांनी सांगितले की, जर एखाद्या महिलेने ऑनलाइन संभाषणादरम्यान वापरलेल्या इमोजी किंवा चित्रांवर खटला दाखल केला तर ज्या व्यक्तीने अशा गोष्टी पाठवल्या आहेत, त्याला शिक्षा होऊ शकते. सौदी अरेबियामध्ये जर कोणी वारंवार हा गुन्हा करत असेल तर पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंड 66 लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.