आयर्लंडचे महाराष्ट्रीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी दिला पदाचा राजीनामा; संसदीय निवडणुकीत झाला पराभव

संसदेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर (Leo Varadkar) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Leo Varadkar (Photo Credit: PTI)

संसदेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर (Leo Varadkar) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. संसदीय मतदानात पुन्हा निवडणुकीसाठी वराडकर यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही, त्यांनी शुक्रवारी डब्लिनमध्ये आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मायकेल डी हिगिन्स यांची भेट घेऊन, आपला राजीनामा सादर केला.

आता येणारे नवीन सरकार कार्यभार स्वीकारूपर्यंत वराडकर हे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कायम राहतील. लिओ वराडकर हे मूळ कोकणातील मालवणचे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावाला भेट दिली होती.

आयर्लंडमध्ये या महिन्याच्या सुरुवातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. 8 फेब्रुवारीच्या निवडणुकीनंतर कोणताही स्पष्ट निकाल हाती न आल्याने, गुरुवारी संसदेच्या खालच्या सभागृहात पुन्हा डब्लिनमध्ये बैठक झाली आणि पुन्हा संसद दोन आठवड्यांसाठी तहकूब ठेवण्यात आली. आता राजकीय पक्ष नवीन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वराडकर यांना पक्षाकडून फाइन गिले यांनी पुन्हा उमेदवारी दिली होती, पण 160 सदस्यांच्या सभागृहात त्यांना 80 पैकी केवळ 36 मते मिळाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. (हेही वाचा: आयर्लंडच्या पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी भेट; गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत (Video))

सिन फीन पक्षाच्या अध्यक्षा मेरी लॉ मॅकडोनल्ड यांना 45 आणि फियाना फिइलचे नेते मायकेल मार्टिन यांना 41 मते मिळाली. दरम्यान, लिओ यांनी वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. पुढे त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवले. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. त्यानंतर 2017 साली ते आयर्लंडचे पंतप्रधान झाले.