Iran Shocker: इराणमध्ये शेकडो मुलींना देण्यात आले विष, समोर आले धक्कादायक कारण, जाणून घ्या सविस्तर
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून, कोम शहरातील शाळकरी मुलींच्या शरीरात विषबाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी इराणचे उप आरोग्य मंत्री युनूस पनाही (Minister Younes Panahi) यांनी या घटनेला दुजोरा दिला.
इराणमध्ये (Iran) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी इथे शेकडो मुलींना विष पाजल्याची घटना इराणमधील एका शहरात समोर आली आहे. इराणच्या एका मंत्र्याने याबाबत खुलासा केला आहे. मंत्री म्हणाले की कोम (Qom) या पवित्र शहरासह अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा बंद करण्यासाठी काही लोकांनी शेकडो विद्यार्थिनींना विषबाधा केली होती. हे विष रासायनिक संयुगाच्या स्वरूपात देण्यात आले असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून, कोम शहरातील शाळकरी मुलींच्या शरीरात विषबाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी इराणचे उप आरोग्य मंत्री युनूस पनाही (Minister Younes Panahi) यांनी या घटनेला दुजोरा दिला. इराणच्या स्थानिक मीडियानुसार, कोममधील शाळांमध्ये अनेक विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती. मंत्री पनाही यांनी या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या चार शहरांमधील 14 शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लक्ष्य करण्यात आले आहे.
यामध्ये वायव्येकडील अर्देबिल शहर, राजधानी तेहरान, पश्चिमेकडील बोरोझार्ड शहर आणि कोम शहराचा समावेश आहे. कोम शहर हे इराणचे पवित्र शहर मानले जाते आणि ते अतिशय पुराणमतवादी आणि धार्मिकदृष्ट्या कट्टर शहर मानले जाते. देशातील बहुतेक नेते आणि राष्ट्रपतींनी त्यांचे धार्मिक शिक्षण कोम शहरातून घेतले आहे. (हेही वाचा: Contraceptives Ban in Afghanistan: तालिबानने घातली गर्भनिरोधकांवर बंदी, म्हटले- 'हे मुस्लिमांची लोकसंख्या रोखण्याचे पश्चिमी देशांचे षडयंत्र')
मुलींना विषबाधा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा इराणमध्ये नुकतेच हिजाबविरोधी हिंसक निदर्शने देशभरात पसरली आहेत आणि याला जगभरातून समर्थन मिळाले आहे. 22 वर्षीय महसा अमिनी हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे निदर्शने उफाळून आली, ज्याला हिंसक वळण लागले. या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांनी 500 हून अधिक लोक मारले, चार आंदोलकांना फाशी देण्यात आली आणि हजारो लोकांना तुरुंगात टाकले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2023 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

