Iran CCTV For Women: हिजाब न घालणाऱ्या महिलांवर इराण सरकार ठेवणार नजर; सार्वजनिक ठिकाणी बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे
हिजाबने आपले डोके नीट न झाकल्याने महसाला इराणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर महसाचा पोलीस कोठडीत गूढ मृत्यू झाला. यानंतर देशभरात हिंसक निदर्शनेही झाली.
गेल्या अनेक महिन्यांपासून इराणमध्ये (Iran) हिजाबविरोधी आंदोलने सुरु आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता कठोर हिजाब कायद्याच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी इराण सरकार नवनवीन डावपेच अवलंबत आहे. महिलांवर नजर ठेवता यावी यासाठी सरकार सार्वजनिक ठिकाणी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी नैतिक पोलिसांच्या कोठडीत एका तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने सुरु झाली. जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये देखील याची खूप चर्चा सुरु आहे. अनेक महिलांनी आपले केस कापून या सरकारविरोधी निषेधाला पाठींबा दर्शवला आहे.
इराणमध्ये महिलांबाबत कठोर भूमिका घेतली जाते. येथे महिलांना हिजाब घालण्याचे सक्त आदेश आहेत. हिजाब अनिवार्य ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र, ड्रेसकोडच्या कडकपणाविरोधात महिला रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. यामुळे घाबरलेल्या इराण सरकारने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की महिलांना सीसीटीव्हीद्वारे चिन्हांकित केले जाईल आणि नंतर अनिवार्य ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा केली जाईल. यासाठी सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना चेतावणी दिली जाईल. (हेही वाचा: 'मिफेप्रिस्टोन' गर्भपात गोळीवर टेक्सासमधील न्यायाधीशांनी घातली बंदी; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या)
हा संपूर्ण वाद 22 वर्षीय इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झाला होता. हिजाबने आपले डोके नीट न झाकल्याने महसाला इराणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर महसाचा पोलीस कोठडीत गूढ मृत्यू झाला. यानंतर देशभरात हिंसक निदर्शनेही झाली. हिंसक चकमकींमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. या घटनेपासून सक्तीच्या ड्रेसला विरोध करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. इराणमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला हिजाबशिवाय दुकानात उभ्या आहेत. यावेळी हिजाब घातला नसल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.