HSBC Layoffs: 35 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार; नफेत घट झाल्याने बँकेने घेतला मोठा निर्णय

यामध्ये 35,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा समावेश आहे. सलग तीन वर्षे कंपनीचा घटत असलेला नफा हे त्याचे मुख्य कारण आहे

HSBC (Photo Credit: PTI)

हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने (HSBC) मंगळवारी आपल्या व्यवसायाची तर्कसंगत पुनर्रचना करण्याची घोषणा केली. बँक येत्या काही वर्षांमध्ये आपल्या योजनांमध्ये मोठे बदल करणार आहे. यामध्ये 35,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा समावेश आहे. सलग तीन वर्षे कंपनीचा घटत असलेला नफा हे त्याचे मुख्य कारण आहे. युरोप आणि अमेरिकेतही बँक त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती कमी करेल असे सांगण्यात आले आहे.

अमेरिका-चीन व्यापार युद्ध, युरोपियन युनियनमधून ब्रिटनचे बाहेर पडणे आणि चीनमधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर बँकेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अलिकडच्या काळात बँकेच्या आशियातील व्यवसायाने चांगली कामगिरी केली आहे परंतु युरोप आणि अमेरिकेत व्यवसाय चांगला चालत नाही.

एचएसबीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन म्हणाले की, 'बँकेच्या व्यवसायातील काही भाग चांगला परतावा देत नाहीत. परतावा वाढविण्यासाठी नवीन योजना आखल्या गेल्या आहेत. येत्या तीन वर्षांत एचएसबीसीतील कर्मचार्‍यांची संख्या 2.35 लाखांवरून कमी करून 2 लाख केली जाईल.'  अशा प्रकारे 2022 पर्यंत सुमारे 32 हजार कोटी कपात करण्याची योजना असल्याचे बँकेने म्हटले आहे. (हेही वाचा: सरकारी तिजोरीत खडखडाट! विकासासाठी राज्य कर्मचारी वेतन कपात करण्यावर होतोय विचार)

यातील बरीचशी कपात अमेरिकन आणि युरोपियन व्यवसायामधील असेल. अमेरिकेत, शाखांची संख्या 30% कमी करण्याची बँकेची योजना आहे. मागील वर्षी करापूर्वी 13.3 अब्ज डॉलर्सच्या बँकेचा नफा होता, हे एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत का नफा 33% कमी आहे. यासंदर्भात अजूनतरी तपशीलवार माहिती समोर आली नाही, मात्र 2012 पासून बँकेची पुनर्रचना करण्याची योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे.