Four-Day Week Work: जर्मनीतील कंपन्यांचा मोठा निर्णय; 1 फेब्रुवारीपासून होणार आठवड्यातून फक्त चार दिवस काम, जाणून घ्या कामगार समस्या सोडवण्यासाठी कशी होईल मदत
ज्या कामगारांनी यामध्ये भाग घेतला त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले तर बर्नआउट कमी झाले. अभ्यासानंतर, कोणत्याही सहभागी कंपनीने पाच दिवसांच्या आठवड्यात परत जाण्याची योजना आखली नाही.
Four-Day Week Work Germany: आठवड्यातून फक्त चार दिवस काम (Four-Day Week Work) करण्याचा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. अनेक देशांमध्ये त्याचा अवलंब केला जात आहे. या यादीत जोडले गेलेले नवीनतम नाव म्हणजे, जर्मनी (Germany). या ठिकाणी अनेक कंपन्यांनी 4-दिवसीय कामाचा आठवडा लागू केला आहे. जर्मनीपूर्वी, अनेक देशांमध्ये चार दिवस कामाच्या आठवड्याची चाचणी केली आहे आणि तो स्वीकारलाही आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याची संस्कृती स्वीकारत आहेत. या अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सात दिवसांपैकी फक्त 4 दिवस काम करण्यास सांगत आहेत. उर्वरित दिवस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केलेली नाही.
अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या सध्या 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याची चाचणी घेत आहेत. या प्रयोगात सुमारे 45 कंपन्या सहभागी होत आहेत. यामध्ये सहभागी कंपन्या पगारात कोणताही बदल न करता कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करत आहेत. यापूर्वी 2022 मध्ये ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी असाच प्रयोग केला होता.
जर्मनी सध्या आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आर्थिक मंदीत पडली. त्यानंतर आर्थिक प्रगतीच्या मार्गावर परतण्यासाठी जर्मनीची धडपड सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीत कंपन्यांना अडचणी येत आहेत. कंपन्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे काम करणाऱ्या लोकांची कमतरता. गेल्या वर्षी इंडस्ट्री लॉबीच्या सर्वेक्षणानुसार, निम्म्या जर्मन कंपन्या किमान अंशतः रिक्त जागा भरण्यास अक्षम ठरल्या आहेत. सॉफ्टवेअर दिग्गज SAP SE ने 2022 मध्ये अर्जदारांकडून विद्यापीठाच्या पदव्या मागणे बंद केले, तर रिअल इस्टेट फर्म वोनोव्हिया एसइने कामगार टंचाईचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षी कोलंबियामधील लोकांची भरती केली.
अनेक कामगार संघटना आणि हक्क संघटना कामगारांवरील कामाचा ताण कमी करण्याची मागणी करत आहेत. जर्मनीतही अशा मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत. असे मानले जाते की 4-दिवसीय कार्य सप्ताहामुळे कंपन्यांच्या विद्यमान कर्मचा-यांची उत्पादकता तर वाढेलच, परंतु कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या देखील दूर होईल. 4 दिवस कामाच्या आठवड्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवे कर्मचारी जोडले जाण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, प्रयोगात सहभागी कंपन्या 1 फेब्रुवारीपासून नवे बदल लागू करतील. त्यानंतरच 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्यामुळे जर्मनीची मंद अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होऊ शकेल का नाही हे समजेल. (हेही वाचा: Preesha Chakraborty, 9 वर्षीय भारतीय वंशाची अमेरिकन मुलीचा 'world’s brightest students list' मध्ये समावेश)
दरम्यान, याआधी यूएस आणि कॅनडातील मागील प्रयोगांनी 4 डे वीक ग्लोबलनुसार नफा शक्य असल्याचे सुचवले आहे. ज्या कामगारांनी यामध्ये भाग घेतला त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले तर बर्नआउट कमी झाले. अभ्यासानंतर, कोणत्याही सहभागी कंपनीने पाच दिवसांच्या आठवड्यात परत जाण्याची योजना आखली नाही. या प्रयोगामुळे लक्षात आले की, कर्मचारी केवळ निरोगी आणि आनंदीच राहू शकत नाहीत तर अधिक उत्पादनक्षम देखील होऊ शकतात.