कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी Remdesivir च्या वापरास FDA ची मान्यता; या औषधाने रुग्ण लवकर बरे होत असल्याचा दावा

काही दिवसांपूर्वी अँटीव्हायर ड्रग Remdesivir चाचणीमध्ये अपयशी ठरल्याची बातमी आली होती

Pills (Photo Credits: Pexels) Image used for representational purposes only

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) वर लस किंवा औषध शोधण्यास जवळजवळ सर्व राष्ट्रे प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी अँटीव्हायर ड्रग Remdesivir चाचणीमध्ये अपयशी ठरल्याची बातमी आली होती. मात्र आता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कोरोना विषाणू रूग्णांवर उपचार करण्यासाठी याच अँटी-व्हायरल औषधाच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. काही संशोधकांना असे आढळले की, हे औषध कोरोना विषाणू संक्रमित लोकांना लवकर बरे करण्यास मदत करत आहे, त्यानंतर ही मंजुरी दिली गेली. या संशोधकांमध्ये भारतीय-अमेरिकन डॉक्टर अरुणा सुब्रह्मण्यम यांचा देखील समावेश आहे.

अशाप्रकारे, एफडीएने कोरोना व्हायरस रूग्णांच्या उपचारासाठी अँटी-व्हायरल औषध Remdesivir च्या वापरास मान्यता दिल्याने, मृत्युदर कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संशोधकांना असे आढळले आहे की कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांच्या आरोग्यास वेगाने सुधारण्यासाठी रीमडेसिविर प्रभावी आहे. Remdesivir मुळे रुग्ण सरासरी 11 दिवसांत घरी जाऊ शकतो, तर सामान्य उपचारांमध्ये त्याला 15 दिवसांचा कालावधी लागतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत याबाबत संवाद साधला. ते म्हणाले, 'एफडीएने Remdesivir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे हे ऐकून मला आनंद झाला.' तसेच आरोग्य व मानव सेवा मंत्री अलेक्स अजर यांनी, हे कोरोना विषाणूच्या लढाईसाठीचे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या मंजुरीमुळे Remdesivir संपूर्ण अमेरिकेत वितरित केले जाईल आणि गंभीर आजारी मुलांच्या उपचारांमध्ये त्याचा उपयोग केला जाईल. (हेही वाचा: Coronavirus Drug: कोरोना व्हायरसची पहिली लस Remdesivir ट्रायलमध्ये ठरली अपयशी; WHO च्या अहवालातून खुलासा)

गिलियड (Gilead) आता त्यांच्याकडे असलेल्या सर्व औषधांचे वितरण करून नवीन औषधे बनवण्याची तयारी सुरु करणार आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 63,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 10 लाखाहूनही अधिक लोक संसर्गित असल्याचे आढळले आहे.