Covid-19 Transmission: पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांकडूनही घरात पसरू शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग- Lancet Study
साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे, कारण आम्हाला माहित आहे की कोविड-19 चे गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी लस खूप प्रभावी आहे
देशातील बहुतांश ठिकाणी कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे कमी झाली असली, तरी अजूनही सरकार लोकांना काळजी घेण्याचे, सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) म्हटले आहे की, इथून पुढे आपला निष्काळजीपणाच कोरोना संसर्गाची परिस्थिती आणखी बिघडवू शकतो. आता एका लॅन्सेट अभ्यासात समोर आले आहे की, हिवाळ्याच्या महिन्यांत घरात कोविड संसर्ग वाढू शकतो व ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा लोकांनाही हा संसर्ग होऊ शकतो व ते लोकखील हा संसर्ग पसरवू शकतात.
सुमारे एक वर्षाच्या अभ्यासाच्या आधारे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले असून, कोरोनाविरुद्धचा लढा अजून ढिला पडू दिला जाऊ शकत नसल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले आहे. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हे सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांना कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असेही लोकही कोरोनाचा डेल्टा प्रकार घरामध्ये पसरवू शकतात किंवा त्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. यात असेही म्हटले आहे की, लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या लोकांच्या तुलनेत ज्यांनी फक्त एक डोस घेतला आहे अशा लोकांना हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
इंग्लंडमधील इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांना असे आढळून आले की, ज्यांनी लसीचे पूर्ण डोस घेतले आहेत असे लोक लवकर संक्रमणमुक्त होतात. मात्र गंभीर संसर्गादरम्यान अशा लोकांमध्येही तितकाच व्हायरल लोड असतो जितका लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये असतो. यावरून असेही लोकही घरातील इतरांना सहज कसे संक्रमित करू शकतात हे स्पष्ट होते. (हेही वाचा: COVID19 Vaccine: अमेरिकेत आता 5-11 वयोगटातील मुलांना सुद्धा दिली जाणार कोरोनावरील लस, फायजरच्या डोससाठी FDA ची मंजुरी)
संशोधकांनी सांगितले की, कोरोनाचे बहुतेक संक्रमण घरांमध्ये एकापासून दुसऱ्यामध्ये पसरल्याचे आढळले आहे. या अभ्यासात सहभागी असलेले लंडन इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर अजित लालवाणी म्हणाले, 'साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे, कारण आम्हाला माहित आहे की कोविड-19 चे गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी लस खूप प्रभावी आहे.’ पुढे त्यांनी सांगितले की, निष्कर्ष असे सूचित करतात की डेल्टा प्रकाराचा संसर्ग होण्यापासून रोखणे आणि त्याचा स्थानिक पातळीवर प्रसार रोखणे यासाठी फक्त लसीकरण पुरेसे नाही.