'कोरोना व्हायरस' मुळे चीन मधील मृतांचा आकडा 106 वर पोहचला

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1300 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

Coronavirus Outbreak in China (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवसेंदिवस चीनमध्ये पसरत असून अनेक जण या आजाराचा शिकार होत आहेत. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1300 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती गंभीर असल्याची कबुली अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे. चीनमध्ये या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

या आजाराचे कोणतेही लक्षण आढळत नाही. त्यामुळे हा आजार अतिशय धोकादायक आहे. या आजारापासून जीव वाचवण्यासाठी चीनमधील वुहान शहरामध्ये लोकांना कैद करून ठेवण्यात आलं आहे. तसेच शाळा-कॉलेजलाही सुट्टी देण्यात आली आहे. चीन सरकारने कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यप्राण्यांच्या व्यापारावर तात्पुरती बंदी आणली आहे. (हेही वाचा - चीन मध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; Wuhan शहरातून भारतीयांच्या मदतीसाठी AIR India ची विमानं सज्ज!)

चीनमध्ये वुहान शहरात कोरोना व्हायरस लागण झपाट्याने होत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवीन रुग्णालय उभारण्यात आलं आहे. 23 जानेवारी रोजी या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. येत्या 3 फेब्रुवारीला या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. या रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे.