AstraZeneca ची लस दिल्यानंतर ब्रिटनमध्ये Blood Clot ची 30 प्रकरणे, 7 जणांचा मृत्य- UK Regulator
यूके नियामक म्हणाले की, देशात 1.81 कोटी डोस दिल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या 30 घटना घडल्या आहेत
ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) कोरोना विषाणूच्या लसीकडून (Coronavirus Vaccine) जगाला फार मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आता या लसीचे दुष्परिणाम समोर आले आहेत. युरोपियन देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये दिसून आलेल्या परिणामांमुळे चिंता वाढू लागली आहे. ब्रिटनच्या वैद्यकीय नियामकांनी (British Regulators) शनिवारी सांगितले की, लस घेतल्यानंतर ज्या 30 जणांमध्ये ब्लड क्लॉट (Blood Clot) दिसून आले होते त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बर्याच देशांमध्ये सध्या ही लस बंद केली गेली आहे, मात्र रक्ताच्या गुठळ्याचा अद्याप या लसीशी थेट संबंध समोर आला नाही.
ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने एक निवेदन जारी करत सांगितले आहे की, 24 मार्च पर्यंत नोंदवलेल्या 30 प्रकरणांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यूके नियामक म्हणाले की, देशात 1.81 कोटी डोस दिल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या 30 घटना घडल्या आहेत. वेबसाइटवर सांगितले गेले आहे की, विद्यमान डेटाच्या आधारे या कोरोना व्हायरस लसीचे फायदे हे त्याच्या दुष्परिणामांपेक्षा जास्त आढळले आहेत. कंपनीने असेही सांगितले होते की, त्यांची लस रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढवत नाही. (हेही वाचा: Second Wave of COVID-19: भारतात एप्रिलच्या मध्यावर शिगेला पोहोचेल कोरोना विषाणूचा संसर्ग; शास्त्रज्ञांनी वर्तवला धक्कादायक अंदाज)
दुसरीकडे Pfizer/BioNTech च्या लसीसंदर्भात असा कोणताही अहवाल समोर आलेला नाही. यूकेमध्ये याचे 3.1 कोटी डोस देण्यात आला असून, लोकांना लसीची कंपनी निवडण्याचा अधिकार नाही. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेसोबत युरोपियन मेडिसीन एजन्सीने ही लस सुरक्षित घोषित केली होती. 7 एप्रिलला यासंदर्भात नवीन एडव्हायजरी जारी केली जाऊ शकते. दरम्यान, काही देश अॅस्ट्रॅजेनेका लस वापरण्यास प्रतिबंधित करीत आहेत, तर काहींनी पुन्हा ही रोगप्रतिबंधक लस देणे सुरु केले आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या काही देशांनी अॅस्ट्रॅजेनेका लसीशी संबंधित चिंतेमुळे वृद्धांना ही लस घेण्यास मनाई केली आहे.