Water From Urine and Sweat: अंतराळातील मूत्र आणि घामातून प्राप्त केले पिण्यायोग्य पाणी; NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश, जाणून घ्या सविस्तर
पिण्यायोग्य पाणी पुनर्संचयित करण्याची ही पद्धत मंगळ सारख्या लांब अंतराळ मोहिमांमध्ये मदत करू शकते.
अंतराळात (Space) दीर्घकाळ राहण्यासाठी आणि मोठ-मोठ्या मोहिमा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी (Water). अंतराळात पाण्याचा शोध अनेक दशकांपासून चालू आहे. अंतराळात पाण्याचा शोध म्हणजे नवीन जीवनाचा शोध आहे. याबाबत एक नवीन अपडेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून समोर आले आहे. माहितीनुसार अंतराळात शास्त्रज्ञांनी एका पद्धतीने 98 टक्के पाणी पुनर्संचयित केले आहे. याकडे मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने सांगितले की, शास्त्रज्ञांनी अंतराळवीरांच्या घामाचा आणि मूत्राचा पुनर्वापर करून ते पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित केले आहे.
अशाप्रकारे नासाने अंतराळातील पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे.
Space.com च्या बातमीनुसार, स्पेस स्टेशनवरील प्रत्येक अंतराळवीराला पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि इतर वापरासाठी दररोज एक गॅलन पाणी आवश्यक आहे. द्रव गोष्टीमधून पाणी पुनर्संचयित करण्यासाठी अंतराळवीरांनी ECLSS चा भाग असलेल्या प्रणालींचा वापर केला. ECLSS म्हणजे पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम, ज्याचे उद्दिष्ट अंतराळात पुढील वापरासाठी अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर करणे आहे. (हेही वाचा: भारतातील पाण्याच्या कमतरतेमुळे पृथ्वीचा ध्रुव पूर्वेकडे सरकला; भू-गर्भातील पाणी उपसल्याने परिभ्रमणावर परिणाम)
ECLSS बनवणाऱ्या हार्डवेअरमध्ये पाणी पुनर्प्राप्ती प्रणाली समाविष्ट असते, जी सांडपाणी गोळा करते आणि ते पिण्यायोग्य पाणी तयार करणाऱ्या वॉटर प्रोसेसर असेंबलीकडे (WPS) पाठवते. केबिन क्रूच्या श्वासोच्छ्वास आणि घामाद्वारे हवेतून बाहेर पडणारा ओलावा कॅप्चर करण्यासाठी प्रगत डिह्युमिडिफायर वापरला जातो. दुसरी प्रणाली, युरिन प्रोसेसर असेंब्ली (UPA), जे मूत्रातून पाणी काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम डिस्टिलेशन वापरते. सांडपाणी काढून टाकण्यासाठी युरिन प्रोसेसर असेंब्लीला ब्राइन प्रोसेसर असेंबली (BPA) जोडली जाते. त्याद्वारे मूत्रातून पाणी वेगळे केले जाते.
जॉन्सन स्पेस सेंटर टीमचा एक भाग असलेल्या क्रिस्टोफर ब्राउन यांनी सांगितले की, बीपीएने मूत्रातून स्वच्छ पाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 98 टक्क्यांपर्यंत वाढवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. पिण्यायोग्य पाणी पुनर्संचयित करण्याची ही पद्धत मंगळ सारख्या लांब अंतराळ मोहिमांमध्ये मदत करू शकते.