PUBG Mobile Coming Back: पुन्हा एकदा 'पब्जी' खेळण्यासाठी व्हा तयार; लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार PUBG Mobile India
आता आपण पुन्हा आपला आवडता खेळ खेळण्याची तयारी करा, कारण पब्जीने आपल्या भारतामधील रिलॉन्चची सर्व तयारी पूर्ण केली आहे
अखेर पब्जी (PUBG) खेळणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी आली आहे. आता आपण पुन्हा आपला आवडता खेळ खेळण्याची तयारी करा, कारण पब्जीने आपल्या भारतामधील रिलॉन्चची सर्व तयारी पूर्ण केली आहे. दक्षिण कोरियाची कंपनी पब्जी कॉर्पोरेशनने (PUBG Corporation) जाहीर केले आहे की, कंपनी भारतीय बाजारासाठी एक नवीन गेम घेऊन येत आहे, जो केवळ भारतासाठी बनविला गेला आहे. यावेळी कंपनी चिनी कंपनीबरोबर कोणतीही भागीदारी करणार नाही. डेटा संरक्षणासाठी पब्जीने जगातील नामांकित टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट (Microsoft) बरोबर हातमिळवणी केली आहे.
कंपनीने म्हटले आहे की नवीन अॅप डेटा सुरक्षेचे चांगल्या प्रकारे पालन करेल. कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करण्यासही तयार आहे. PUBG Corporation ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'दक्षिण कोरियाची कंपनी Krafton ची उपकंपनी असलेल्या Players Unknown Battleground (PUBG) चे क्रिएटर PUBG Corporation ने आज जाहीर केले की भारतात PUBG Mobile India सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
PUBG Corporation ने असेही जाहीर केले आहे की, कंपनी प्लेयर्सशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी भारतात एक उप-सहायक कंपनी तयार करेल. भारतामध्ये पब्जीचे 100 कर्मचारी असतील. यासाठी स्थानिक कार्यालये तयार केली जातील आणि स्थानिक व्यवसायाच्या निमित्ताने कंपनी येथे गेमिंग सेवा चालवेल. PUBG Corporation ची मूळ कंपनी Krafton Inc ने भारतात 100 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक गुंतवणूक, ई खेळ, करमणूक व आयटी उद्योगात ही गुंतवणूक केली जाईल. ही गुंतवणूक भारतातील कोणत्याही कोरियन कंपनीने केलेली सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Samsung Launches The Sero Rotating Smart TV: सॅमसंगने लाँच केली 'द सेरो' रोटेटिंग टीव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
हा गेम भारतामध्ये कधी सादर केला जाईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, भारत-चीन सीमा विवादानंतर केंद्र सरकारने 224 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत भारत सरकारने या अॅप्सवर बंदी घातली होती, त्यामध्ये पब्जीचाही समावेश होता.